पुणे : शहरातील भाजपकडे असलेल्या ६ पैकी ६ विधानसभा मतदारसंघांत पक्षाने विजय खेचून आणला. शिवाय मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षालाही एक जागा मिळवून दिली. स्वत:चा सक्सेस रेट शंभर टक्के ठेवला. हे जमते तरी कसे? सातत्याने असेच का होते आहे? याबाबत पुण्यातीलच काही जुन्या भाजप कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला असता संघटनेची शक्ती, कार्यकर्त्यांचे कष्ट, नेत्यांकडून दिली जात असलेली दिशा आणि ऐनवेळी उभे राहणारे संघ स्वयंसेवकांचे पाठबळ यातून हे यश साकारले, असा सूर त्यांनी आळवला.
जिथे केंद्र तिथे भाजपचा बूथ
भाजपची पक्ष म्हणून असलेली संघटना मागील काही वर्षांत फारच बलवान करण्यात आली आहे, असे एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले. ते म्हणाले, ‘निवडणूक यंत्रणा काय काम करेल, अशा पद्धतीने भाजपची संघटना काम करते. आयोगाने प्रत्येक मतदारसंघासाठी तयार केलेल्या प्रत्येक मतदान केंद्राची काटेकोर माहिती संघटनेकडे कितीतरी आधीपासून असते. कोणत्या केंद्रात किती खोल्या, त्यात किती मतदार, त्यांची नावे, पत्ते, वय अशी साद्यंत माहिती भाजप कार्यालयात असते. त्यानुसार संघटनेकडून कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या होतात. जिथे केंद्र तिथे भाजपचा बूथ, एका बूथवर १० कार्यकर्ते, अशा १० बूथचा एक केंद्रीय बूथ, अशा १० केंद्रीय बूथचा पुन्हा एक मुख्य बूथ, अशी ही बारकाईने रचना केलेली असते. हीच रचना यशस्वी ठरली आहे. ही रचना फक्त कागदावर राहणार नाही, यासाठी म्हणून पक्षाची एक वेगळी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत असते, अशीही माहिती मिळाली.
१ हजार मतदारांमागे १० कार्यकर्ते
मतदार यादीतील प्रत्येक १ हजार मतदारांमागे १० कार्यकर्ते अशीही एक रचना आहे. या कार्यकर्त्यांनी प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन एकदा नव्हे तर किमान तीन वेळा संपर्क साधायचा आहे. निवडणूक नसतानाही हे मानवी यंत्र सतत सुरू असते. कधी ‘घरघर तिरंगा’साठी, तर कधी ‘हर घर मोदी’साठी आणि कधी ‘सदस्य नोंदणी’साठी. त्यामुळे बूथवरील प्रत्येक कार्यकर्त्याचा त्याच्या क्षेत्रातील जवळपास प्रत्येक मतदाराबरोबर एकदा नव्हे तर अनेकदा संपर्क येत असतो. तो तसा येत राहील, याची काळजी नेते, पदाधिकारी घेत राहतात. त्यांच्याकडून सातत्याने सुरू असलेल्या कामाची माहिती घेतली जात असते, असे फिल्डवर काम करत असलेल्या काही कार्यकर्त्यांनी सांगितले.
कामाची होते तपासणी
माहितीच्या देवाणघेवाणीचीही एक स्वतंत्र यंत्रणा भाजपच्या संघटनेत विकसित करण्यात आलेली आहे. प्रत्येक प्रमुखाने आपल्यावरील प्रमुखांना केलेल्या कामाचा अहवाल देणे त्यांच्यावर बंधनकारक आहे. एखाद्या वरिष्ठांकडून अचानक एखाद्या मंडळाची तपासणी केली जाते. तिथे काय सुरू आहे, ते प्रत्यक्ष भेट देऊन पाहिले जाते. त्यामुळे खोटेपणाला वाव नाही, कामचुकारांना पाठीशी घालणे नाही आणि वशिला कोणाला पदाधिकारी, कार्यकर्ता म्हणून नेमणेही नाही. कामच करायचे व त्यातूनच मोठे व्हायचे, अशी सवयच भाजपच्या संघटनेने प्रत्येक कार्यकर्त्याला घालून दिली आहे व त्याचे पालन केले जाईल याची काळजीही घेतली जाते, अशी माहिती भाजपच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली.
निवडणूक असोनसो, काम सुरूच
एकाच कोणत्या तरी निवडणुकीसाठी नाही तर कोणत्याही निवडणुकीसाठी भाजपच्या संघटनेकडून हे काम केलेच जाते. उमेदवाराचा प्रचार, त्यासाठीच्या नेत्यांच्या सभा, पत्रकांचे वाटप या सर्व गोष्टी वेगळ्या. त्या उमेदवार, नेत्यांच्या स्तरावरून पार पाडल्या जातात. संघटनेचे मूळ काम हे प्रत्येक मतदारापर्यंत जाण्याचे, त्याच्यापर्यंत पक्ष, पक्षाचा विचार, ध्येयधोरणे पोहोचवणे, त्याला समजावून, पटवून सांगणे हेच आहे व तेच आम्ही करतो. ते चांगले केले तर त्याचा विचार होतो, मग थोडी वरची जबाबदारी दिली जाते, हे बाकीच्या कार्यकर्त्यांना दिसते, त्यामुळे कामाची स्पर्धा लागल्यासारखेच होते, असे काही कार्यकर्त्यांनी सांगितले.
‘आरएसएस’चे पाठबळ
कार्यकर्त्यांच्याच संवादातून एक गोष्ट लक्षात आली व कार्यकर्तेही ती राजीखुशीने मान्य करतात, ती म्हणजे यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने राबवलेली प्रबोधन मोहीम. स्वयंसेवक कोणत्याही पक्षाचे नाव न घेता घरोघर संपर्क साधून मतदानाचे आवाहन करत होते, मात्र त्यांनी नाव घेतले नाही तरी मतदान कोणाला करायचे? राष्ट्रीय प्रश्नांवर कोण काम करते आहे? हे सांगण्याची गरज नव्हतीच; पण त्यांच्या मतदान करण्याच्या आवाहनामुळे यावेळी मतदानाचा टक्का एकदम वाढला, हा वाढलेला टक्का भाजपकडे तसेच महायुतीकडे वळाला व महायुतीला हा विजय मिळाला, असे या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
फक्त पुण्यातीलच नाही तर राज्यातील व देशातीलही भाजपच्या विजयाला पक्षाचे शक्तिमान संघटन कारणीभूत आहे, हे खरेच आहे. महाराष्ट्रात आणि पुण्यातही यावेळी त्याला सरकारी योजनांचे पाठबळ मिळाले. त्याशिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मोहीमही प्रभावी ठरली. या सर्व गोष्टींमधून हा देदीप्यमान विजय साकारला गेला. -योगेश गोगावले, माजी शहराध्यक्ष, प्रदेश प्रशिक्षण प्रमुख, भाजप
संघटना म्हणून एका ध्येयाने काम करण्याची सवय आम्हाला लावली गेली आहे. त्यामुळे फक्त शो किंवा केवळ व्हिजिटिंग कार्ड काढून काम काहीच करायचे नाही, असे भाजपत होत नाही. इथे दिलेले काम करावेच लागते. त्यातूनच संघटनेची म्हणून एक वेगळी ताकद शहरात आहे. त्याचा तर उपयोग झालाच, शिवाय अन्य गोष्टींचीही मदत मिळाली. -धीरज घाटे, शहराध्यक्ष, भाजप