लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाईसाठी पाठविलेल्या कलम १८८ च्या नोटीसा मागे घेण्याबाबत गृह विभागाशी चर्चा करत आहोत. याबाबत सकारात्मक चर्चा करून नागरिकांना त्रास होणार नाही याची पूर्ण काळजी घेऊ,” असे आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहे़
राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेश सदस्य प्रदीप देशमुख, कार्यकर्ते विनोद पवार आदींनी गृहमंत्र्यांची भेट घेऊन नागरिकांवर होणारी कारवाई त्रासदायक असून ती मागे घेण्याची विनंती करणारे निवेदन दिले. त्यावेळी गृहमंत्र्यांनी हे आश्वासन दिले.
याबाबत प्रदीप देशमुख म्हणाले की, लॉकडाऊन काळात रस्त्यावर दिसलेल्या नागरिकांना पोलीसांनी समज देऊन त्यांची नावे लिहून घेतली होती. त्यांच्यावर कलम १८८ नुसार कारवाईच्या नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत़ परंतु, यातील अनेक नागरिक काही निकडीच्या कामासाठीही घराबाहेर पडले होते. त्या काळात असलेल्या कामाच्या ताणामुळे पोलीसांनी केवळ नावे लिहून घेतली. आता त्यांना नोटीसा येत असल्यामुळे कायदेशीर कारवाईची भीती निर्माण झाली आहे. एकट्या पुणे शहरातच असे २८ हजारांवर नागरिक असून, त्यांना नोटिसा येत आहेत़
राज्याचा विचार केला तर हा आकडा काही लाखांत आहे. त्यामुळे मानवतावादी भूमिका घेऊन कलम १८८ नुसार पाठविण्यात आलेल्या नोटीसा रद्द कराव्यात अशी मागणी गृहमंत्र्यांकडे करण्यात आली़ त्यावर गृहमंत्री देशमुख यांनी गृह विभागाच्या सचिवांशी चर्चा करून, राज्य पातळीवर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले असल्याचे प्रदीप देशमुख म्हणाले.
----------------
फोटो मेल केला आहे़