वाघोली: वाघोली उबाळे नगर येथे राहणाऱ्या एका पेपर विक्रेत्या महिलेला गुन्हा मागे घेण्यासाठी एकाने धमकी दिल्याची तक्रार संबंधित महिलेने पोलिसात दिली. या प्रकरणी धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रोहित गवळी (पुणे-नगर महामार्गाजवळ खांदवे नगर ) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी महिला पेपर विक्रीचा व्यवसाय करत स्वतःचा व आपल्या दोन मुलींचा उदरनिर्वाह करते. खांदवे नगरच्या कॉर्नरला पेपर विक्री करत असताना एका व्यक्तीने महिलेला तिच्या स्टॉलवर भेटून सांगितले की, मी रोहित गवळी मला तुम्ही ओळखता का? मी आत्ताच जेलमधून बाहेर आलो आहे. मला असिफ भाईने तुम्हाला निरोप द्यायला पाठवले आहे. तुम्ही जो २०२१ मध्ये गुन्हा दाखल केला आहे तो मागे घ्या. नाहीतर तो बाहेर आल्यावर तुम्हाला मारून टाकेल. त्याने दिलेल्या धमकीमुळे संबंधित महिलेवर दबाव आला. त्यामुळे संबंधित महिलेने पुन्हा पोलिसात जाऊन रोहित गवळी याच्याविरोधात तक्रार दिली. त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास सोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली विमानतळ पोलिस तपास करत आहेत.