पुणे : मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आरक्षणाबाबत राज्य सरकारबरोबरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस शिवाय सरकारमधील पानही हलत नाही. मुख्यमंत्री कोणीही असो निर्णय फडणवीसच घेतात. त्यामुळे मी माझ्याकडे आलेल्या ८ ते १० आमदारांना देवेंद्र फडणवीस यांना जाऊन आरक्षण द्यायला सांगा असं म्हटलं होत. ते सागर बंगल्यावर गेले आणि परत आलेच नाहीत. देवेंद्र फडणवीस सागर बंगल्यावर जादू करतात अशी टीका त्यांनी केली आहे. काल भीमाशंकरचे दर्शन घेण्यासाठी ते पुणे जिल्ह्यात आले होते. आज सकाळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सरकारवर निशाण साधला.
जरांगे पाटील म्हणाले, निवडणूक लढविण्याबाबत पुणे जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांबाबत चर्चा झाली. पण निर्णय कोणताही झाला नाही. पुन्हा एकदा बैठक घेऊ आणि मग ठरवू की निवडणूक लढवायची की २८८ पाडायचे. मराठा समाज निवडणुकीत सन्नाट चालणार आहे. आम्ही रणनीती उघड करणार नाही. नाहीतर देवेंद्र फडणवीस डाव करतील. दहशतीने निवडणूक जिंकता येत नाही तर मायेनं जिंकता येणार असल्याचे पाटील यावेळी म्हणाले आहेत.
राज्यातील नेते मंडळी आंतरवलीत येऊन फुकट चहा पिऊन जातात. पण मी त्यांना नाही म्हणू शकत नाही. फडणवीसांच्या जवळचे मला येऊन मला गुपचूप भेटतात आणि फडणवीसांची तक्रार करतात. निवडणूक लढवण्याची वेळ आली तर मी सगळं उघड करेन. देवेंद्र फडणवीस खुनशी आणि मराठा द्वेषी आहेत. त्यामुळे सगे सोयरेचा निर्णय होत नाही. देवेंद्र फडणवीस आमचा शत्रू नाही, पण मराठा द्वेशी आणि वागण्याची पद्धत विचित्र आहे. माझ्यावर खोटा खटला दाखल केला. मराठवाड्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पोहचावा यांसाठी आम्ही नाटक आणलं होतं. त्यात तोटा आला. आम्ही आमच्या परीने पैसे दिले. जबाबदारी वाटून घेतली. पण माझ्यावर देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर खोटा खटला दाखल केला असल्याचा आरोपही जरांगे पाटील यांनी केला आहे. मराठवाड्यात पावसामुळे मोठं नुकसान झालंय. पण मदत मिळत नसल्याचा आरोप त्यांनी सरकारवर केला आहे.