पुणे : बनावट कागदपत्रे तयार करुन जबरदस्तीने सह्या घेऊन लक्ष्मी रोडवरील दुकानाचा ताबा घेतल्यानंतर ते दुकान परस्पर विक्री केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी सराईत गुंडासह तिघांना अटक केली आहे.
गणेश बाबुराव यादव (रा़ पर्वतीगाव), श्रीकांत वसंतराव तेरभाई (रा. भुसारी कॉलनी, कोथरुड) आणि परेश अनिलकुमार भंडारी (रा.महावीर रेसिडेन्सी, कोंढवा बुद्रुक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़ गणेश यादव हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.
याप्रकरणी महर्षीनगर येथे राहणाऱ्या एका ३२ वर्षाच्या तरुणाने फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे मेसर्स कला हे लक्ष्मी रोडवरील कुंटे चौकातील सेवासदन बिल्डिंग येथे दुकान आहे. फिर्यादी यांनी या दुकानाचे त्यांच्या हिस्स्याचे कुलमुख्यत्यार पत्र त्यांचे वडिलांचे नावे केल्याबाबत व वडिलांना काही आजाराचा त्रास असल्याचे आरोपींना माहिती होते. त्याचा फायदा घेऊन गणेश यादव याने त्यांच्या वडिलांना तुमच्या घरातील लोकांचे बरे वाईट करु अशी धमकी दिली. त्यांना व फिर्यादी यांचे चुलते यांना २५ सप्टेबर २०१८ रोजी मित्रमंडळ चौकातून जबरदस्तीने हवेली दुय्यम निबंधक कार्यालयात नेले. तेथे दुकानाचे प्रॉपर्टी मॅनेजर म्हणून गणेश यादव याची नेमणूक केल्याबाबतचे कुलमुखत्यार पत्रावर त्यांच्या वडिलांना सह्या करायला भाग पाडले. त्यानंतर त्याने इतरांच्या मदतीने दीड कोटी रुपये किंमत असलेल्या मेसर्स कला या दुकानाचा जबरदस्तीने ताबा घेतला. तसेचदुकानातील ३० लाख रुपयांचे महागडे फर्निचर, एलसीडी टिव्ही, कॅमेरे, दुकानातील सर्व माल एका व्यक्तीच्या ताब्यात दिला.दुकानातील त्यांची महत्वाची मुळ कागदपत्रे घेतली. यादव व तेरभाई यांनी काहीही अधिकार नसताना दुकानाचा ताबा परेश भंडारी यांना ताबा दिला. त्यानंतर आता फिर्यादी यांनी स्वारगेट पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.