धनकवडी: घरातील कर्त्या पुरुषासह संपूर्ण कुटुंबच कोरोना पाॅझिटिव्ह झाल्यास त्या कुटुंबावर संकटाची कुऱ्हाड कोसळते. कारण कुटुंबांतील अन्य सदस्यांना कसा धीर देणार? कसा उपचार करणार? असे प्रश्न पडू लागतात. परंतु याही परिस्थितीमध्ये धनकवडीच्या मारणे कुटुंबाने आत्मविश्वास न गमावता प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर कोरोनावर मात केली. वेळेत वैद्यकीय उपचार, डाॅक्टरांचे मार्गदर्शन, सकस व पौष्टिक आहार तसेच प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर धनकवडी येथील किरण शिवाजी मारणे, वय ३७ यांनी आणि आई, भाऊ, मुलगी व पुतणी अशा पाच जणांनी कोरोनाला हरवले आहे.
धनकवडी येथील किरण मारणे हे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी आहेत. मागील संपूर्ण वर्षभर योग्य ती काळजी घेऊन ते धनकवडी मधील नागरिकांना दररोज पाणीपुरवठा करण्याचे कर्तव्य बजावत होते. परंतु अखेर मारणे यांना कोरोनाने गाठले. पंधरा दिवसांपूर्वी किरण मारणे यांना अंगात थोडीशी कणकण जाणवू लागल्याने त्यांनी डाँक्टरांकडून औषधे घेतली. औषधे घेतल्यानंतर सुरुवातीला बरं वाटलं मात्र पुन्हा अंगात कणकण, अंग दुखणं, तोंडाला चव नसणं, अशी लक्षणं जाणवू लागली. मारणे यांनी लगेच कोरोना चाचणी केली असता त्यांचा रिपोर्ट पाँझिटिव्ह आला. मात्र इतर काही त्रास नसल्याने वैद्यकीय सल्ल्याने होम आयसोलेशनमध्ये राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला.
दरम्यान दोन दिवसांनंतर मारणे यांची आई सुनिता शिवाजी मारणे (वय ६२वर्षे) यांना सर्दी, ताप, अंगदुखी असा त्रास जाणवू लागला. त्यांची चाचणी केली असता त्यांचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यावेळी मात्र संपूर्ण मारणे कुटुंब चिंताग्रस्त झाले. मात्र मारणे यांनी धीराने परिस्थितीचा सामना करत पुन्हा डॉक्टरांच्या सल्ल्या नुसार आईलासुद्धा होम आयसोलेशन मध्ये ठेवले. आई आणि मुलगा स्वतःची काळजी घेत वेगवेगळ्या खोलीत राहू लागले. दरम्यान आईला अशक्तपणा व खोकल्याचा त्रास जास्त जाणवू लागल्याने तसेच किरण मारणे यांना सुद्धा खोकल्याचा खूप त्रास होत असल्याने डॉक्टर किरण खालाटे यांना दाखवायचे ठरले. डॉक्टरांनी तपासणी करून रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला आणि दोघांनाही दाखल करण्यात आले. त्यानंतर लगेच घरातील इतर सर्वांचे तपासणी करण्यात आली. त्यामध्ये लहान भाऊ रुपेश मारणे, वय ३५ वर्षे, मुलगी सानवी रुपेश मारणे, चारवी किरण मारणे वय दोन वर्षे यांची कोरोना चाचणी सुद्धा पॉझिटिव्ह आली मात्र सौम्य लक्षणे असल्याने त्यांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्या चा सल्ला देण्यात आला. डाँक्टरांच्या सल्ल्याने योग्य औषधोपचार सकस व पौष्टिक आहार आणि सकारा त्मक विचारसरणीसह प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर मारणे कुटुंबातील दोन चिमुकल्यांसह पाचही सदस्यांनी आखेर कोरोनावर यशस्वीरित्या मात केली.