पुणे : माळरानाविषयीची माहिती नागरिकांमध्ये योग्यरीत्या पोचावी, तेथील परिसंस्था काय असते ते समजावे, यासाठी वन विभागाने माळरान सफारी हा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. यात माळरानावरील पक्षी, प्राणी व इतर वन्यजीवांचे दर्शन घडणार आहे. राज्यामध्ये पहिल्यांदाच असा प्रयाेग तेही पुणे जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत आहे. विशेषत: कोल्हा, चिंकारा, लांडगा, ससे, खोकड, तरस आदी प्राणी यात पाहायला मिळतात.
पुणे वन विभागाच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील पहिली ग्रासलँड सफारी आहे. या गवताळ कुरणांवरील सफारीसाठीच्या संकेतस्थळाचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. माळरान म्हणजेच गवताळ कुरण या परिसंस्थेत कोल्हा, चिंकारा, लांडगा, ससे, खोकड, तरस आदी प्राण्यांचा अधिवास असून, तो धोक्यात आला आहे. ताे वाचविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे.
माळरान म्हटलं की, लोकांना ते पडीक रान वाटते. परंतु, या परिसंस्थेत खूप जैवविविधता असते. त्याची ओळख व्हावी म्हणूनच हा उपक्रम राबविला जात आहे. तत्कालीन उपवनसंरक्षक राहुल पाटील यांना ‘द ग्रासलँड्स ट्रस्ट’च्या वतीने हा प्रस्ताव दिला होता. ट्रस्टकडून माळरानावरील वन्यजीवांसाठी अनेक वर्षांपासून काम सुरू आहे. आता सफारी सुरू करण्यासाठी पुणे वनविभागाचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते, सहायक वनसंरक्षक मयूर बोठे, सहायक वनसंरक्षक आशुतोष शेंडगे यांनी पुढाकार घेतला.
स्थानिकांना मिळणार रोजगार :
जिल्ह्यातील बारामती, दौंड, इंदापूर, सासवड, जेजुरी या भागातील वनक्षेत्रात गवताळ कुरणे आहेत. इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी आणि बारामती तालुक्यातील शिर्सुफळ या दोन ठिकाणी ही ग्रासलँड सफारी सुरू केल्या आहेत. यामध्ये वन्यजीव छायाचित्रकारांना चिंकारा, कोल्हा, लांडगा, तरस, ससे अशा प्राण्यांची प्रकाशचित्रे काढता येणार आहेत. या सफारीमुळे स्थानिक ग्रामस्थांना रोजगाराची संधी मिळणार आहे. सफारीसाठी www.grasslandsafari.org या संकेतस्थळावर सर्व माहिती दिली आहे.
बारामती, इंदापूर माळरान
- बारामतीचे क्षेत्र : ६० किमी
- इंदापूर क्षेत्र : ४० किमी
- पक्ष्यांच्या प्रजाती : ३३०
- वन्यजीवांच्या प्रजाती : २३
- पुण्यापासून अंतर : ६० किमी
पर्यटन करताना हे लक्षात ठेवा :
- पर्यटन करताना खूप भडक कपडे घालू नयेत.
- प्लास्टिकचा शक्यतो वापर करू नये.
- पर्यटनाला जाताना प्रवेशद्वारावर प्लास्टिक तपासले जाणार आणि परत जाताना पुन्हा तपासणी होणार आहे.
- कोणत्याही प्रकारचा मोठा आवाज पर्यटनादरम्यान करू नये. वन्यजीवांचा आदर करावा. त्यांना त्रास देऊ नये.
आम्ही अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील माळरानावरील लांडगे, कोल्हे यांच्या संवर्धनासाठी काम करतोय. या वन्यजीवांचा अभ्यास केल्यानंतर वन विभागाकडे आम्ही माळरान सफारीचा प्रस्ताव दिला होता. राज्यात पहिल्यांदाच हा प्रकल्प पुण्यात राबवला जात आहे. त्याचा नक्कीच फायदा होईल. याच्या नियोजनामुळे पर्यटनावर नियंत्रण येण्यास मदत होईल.
- मिहीर गोडबोले, संचालक, द ग्रासलँड्स ट्रस्