लोकमत न्यूज नेटवर्क
इंदापूर : लांडग्याच्या कळपाने अचानक येऊन इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी- कचरवाडी गावामध्ये एका शेतकऱ्याच्या शेळ्यांवर हल्ला चढविला. यामध्ये शेळ्यांची ९ लहान पिल्ले (करडे) लांडग्यांनी जागीच ठार केली. तर ९ पिल्ले पळवून नेली आहेत. या घटनेत माणिक दत्तु कचरे या मेंढपाळाचे सुमारे पावणे दोन लाखाहून अधिक नुकसान झाले आहे. गुरुवारी (दि १८) मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली.
हा प्रकार गावचे सरपंच कुंडलिक कचरे यांनी वन विभागाला कळवले. इंदापूर तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांच्या सूचनेनुसार इंदापूरचे वनपाल विठ्ठल खारतोडे, बिजवडीचे वनरंक्षक डी. बी. गवळी व पशुवैद्यकीय डॉक्टर एम.पी. काझडे, गावकामगार तलाठी गोरक्षनाथ इंगळे यांनी सर्व घटनेचा पंचानामा केला आहे.
यावेळी पुणे जिल्हा सुकाणू समितीचे जिल्हाध्यक्ष ॲड. श्रीकांत करे, गावचे पोलीस पाटील महादेव बरळ, धनाजी कचरे, शशिकांत मिसाळ, भीमराव कचरे ,लहु कचरे, लक्ष्मण कचरे, संतोष जाधव यांच्यासह नागरिक उपस्थित होते.