लांडगेंची हॅट्रिक होणार की पवार गट बाजी मारणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2024 02:38 PM2024-11-18T14:38:24+5:302024-11-18T14:40:06+5:30
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातून शरद पवारांकडे परततेल्या अजित गव्हाणे यांनी त्यांच्यापुढे तगडे आव्हान उभे
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात नव्याने होणाऱ्या गृहप्रकल्पांचा पाणीपुरवठा, सुरक्षा आणि पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूककोंडी या प्रश्नांच्या गर्तेत असलेल्या भोसरी मतदारसंघात यंदा महायुतीतील भाजपचे महेश लांडगे हॅटट्रिक साधण्याच्या तयारीत आहेत. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातून शरद पवारांकडे परततेल्या अजित गव्हाणे यांनी त्यांच्यापुढे तगडे आव्हान उभे केले आहे.
औद्योगिक वसाहतींना खेटून असणारा मतदारसंघ म्हणजे भोसरी. दहा वर्षांत केलेल्या विकासकामांच्या जोरावर लांडगे तिसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहेत. मतदारसंघात त्यांनी आंध्रा धरणाचे पाणी आणले आहे, तर भामा-आसखेड प्रकल्पाच्या कामाचे उद्घाटन झाले आहे. जगातील सर्वांत मोठा छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा आणि संविधान भवन येथे उभारले जात आहे. कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. मोशी येथे ८५० खाटांचे मोठे रुग्णालय बांधण्यात येणार असून त्याचे उद्घाटन झाले आहे. यासह विकासकामांची जंत्रीच लांडगे यांच्याकडून मांडली जात आहे.
दहा वर्षांतील प्रलंबित प्रश्न घेऊन महाविकास आघाडीचे अजित गव्हाणे परिवर्तन करण्यासाठी साद घालत आहेत. विस्तारित भागातील सोसायट्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा, महापालिकेत समाविष्ट गावांतील रखडलेला विकास, उद्योजक आणि व्यापाऱ्यांना गुंडगिरी आणि भ्रष्टाचाराचा करावा लागणारा सामना हे मुद्दे तापवत गव्हाणे रिंगणात उतरले आहेत.
मतदारसंघातील कळीचे मुद्दे
नव्याने झालेल्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये अपुरा पाणीपुरवठा. टँकरने पाणीपुरवठ्यासाठी रहिवाशांना करावी लागणारी पदरमोड.
पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूककोंडी. मतदारसंघातील अरुंद रस्ते, नदीकाठावरील घरांची अतिक्रमणे, शहरातील फेरीवाल्यांचे अतिक्रमण.
परिसरातील उद्योजक-कामगारांची सुरक्षा, उद्योगधंद्यांना खंडित वीजपुरवठ्यामुळे येणाऱ्या अडचणी. मतदारसंघात वाढलेली गुन्हेगारी.
२०१९ मध्ये काय घडले?
महेश लांडगे (भाजप) विजयी
१ लाख ५९ हजार २९५
विलास लांडे (अपक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत)
८१ हजार ७२८