पुणे: सराफी दुकानात सोने खरेदीसाठी जाऊन गाडीत ठेवलेले पैसे आणून देण्याच्या बहाण्याने ५ किलो सोन्याची बिस्किटे घेऊन एका महिलेने पोबारा केला. यात २ काेटी ६० लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी बारा तासांच्या आत त्या महिलेला खारघर येथून बेड्या ठोकत ऐवज जप्त केला.
माधवी सूरज चव्हाण (वय ३२, रा. खारघर) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत पोपटलाल गोल्डचे राकेश सोलंकी यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महिला ही मूळची खारघरची आहे. तिचे माहेर पुण्यातच असून, तिची बहीणदेखील पुण्यातच राहण्यास आहे. पुण्यातून सोने घेऊन ते पुढे जास्त किमतीला देण्याचे काम ती करत करत होती.
फिर्यादीशी गेल्या काही वर्षांपासून तिची ओळख आहे. माधवी बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास रविवार पेठेतील पोपटलाल गोल्डच्या दुकानात आली. नेहमी किलो, अर्धा किलो अशा वजनाचे सोने ती खरेदी करत असे. बुधवारी तिने गर्भवती असल्याने वारंवार येण्यास जमणार नसल्याचे कारण देत तब्बल ५ किलो सोन्याची बिस्किटे खरेदी केली. तिने काही रक्कम कॅश आणि काही रक्कम आरटीजीएस करणार असल्याचे सांगितले. सोन्याची बिस्किटे खरेदी केल्यानंतर गाडीत ठेवण्यात आलेली कॅश घेऊन येण्याच्या बहाण्याने ती दुकानाच्या बाहेर पडली. दुकानदाराने देखील तिच्यामागे एक व्यक्ती पाठविला; परंतु तिथे तिने कर्मचाऱ्याला हुलकावणी देऊन पोबारा केला. त्यानंतर तिने तिचा मोबाइल फोनदेखील बंद केला. याप्रकरणी रात्री उशिरा फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणावरून तिचा माग काढला. दुकानाचे सीसीटीव्ही फुटेज तपासून त्या आधारे तिचा माग काढला असता ती खारघर येथे पोहाेचल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी तिला पकडले. सहायक पोलीस निरीक्षक संतोष शिंदे तपास करीत आहेत.