लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कामाची गरज असल्याचे सांगून घरकाम करण्यास सुरुवात करून जेवणातून गुंगीचे औषध देऊन घरातील दागदागिने, रोख रक्कम असा ९ घरातील ६० लाखांहून अधिक ऐवज लुटून नेणाऱ्या महिलेला वानवडी पोलिसांनी तामिळनाडूहून जेरबंद केले.
शांती चंद्रन (वय ४३, रा. तिरुवअण्णा मलाई, तामिळनाडू) असे या महिलेचे नाव आहे. चंद्रन वेगवेगळी नावे धारण करून डिसेंबर २०१८ पासून लोकांची मोलकरीण बनून चोऱ्या करीत असल्याचे उघडकीस आले असून आतापर्यंत ९ घरांमध्ये तिने अशा प्रकारे चोरी करून ६० लाख १० हजार १०० रुपयांचा ऐवज लुटून नेल्याचे समोर आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घोरपडीतील सोपानबाग येथील मिटटाऊन सोसायटीत एक ६० वर्षांची महिला आपल्या मुलासह राहते. त्यांच्याकडे शांती चंद्रन ही महिला घरकाम करीत होती. घरकाम करण्यासाठी तिने आपले बनावट मराठी नाव सांगितले होते. तिने ८ ऑगस्ट रोजी रात्रीच्या जेवणातून फिर्यादी व त्यांच्या मुलाला गुंगीचे औषध दिले होते. त्यांना गुंगी आल्यावर कपाटात ठेवलेले ९ हजार ५०० रुपये चोरून नेले होते. त्यानंतर ती तामिळनाडूला आपल्या गावी पळून गेली होती.
याबाबत पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी सांगितले की, एकटे राहणारे ज्येष्ठ नागरिक असलेले कुटुंब हेरून ही महिला आपण गरजू असल्याचे सांगत असे. त्यांच्याकडे कामाला सुरुवात करीत. तिच्याकडे आधार कार्ड, फोटो मागितला की उद्या आणून देते असे सांगून दोन-तीन दिवस काम करीत असे. त्यात ती घरातील दागिने, कपाट पाहून ठेवत. त्यानंतर एके दिवशी त्यांच्या जेवणात किंवा पाण्यात झोपेच्या गोळ्या टाकत. ज्येष्ठ नागरिकांना गुंगी आली की घरातील सर्व ऐवज घेऊन पळून जात असे. कोठेही तिने आपली ओळख होईल, अशा बाबी ठेवल्या नव्हत्या. वानवडी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणातून ही महिला तामिळनाडूमध्ये गावी असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तामिळनाडूतून तिला पकडून आणले. सहायक पोलीस निरीक्षक जयवंत जाधव अधिक तपास करीत आहेत.
....
पुण्यातील माजी महिला आमदार यांच्या घरीही गेल्या वर्षी नोव्हेबरमध्ये या महिलेने अव्वा असे नाव सांगून त्यांच्याकडे घरकाम करायला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांच्या घरातून १ लाख १५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता.
.....
स्वत:चा औषधांचा गुन्ह्यांसाठी केला गैरवापर
शांती चंद्रन हिला अनेक विकार आहेत. त्यासाठी तिला डॉक्टरांनी झोपेच्या गोळ्या दिल्या होत्या. या गोळ्या लोकांच्या जेवणात, पिण्याच्या पाण्यात टाकून त्यांना गुंगी आल्यावर घरातील ऐवज चोरुन नेत होती.