सांगवी : बारामती-फलटण महामार्गावरील वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे हा चौक ओलांडताना पादचारी देखील धास्तावलेले असतात. शिरवली,कांबळेश्वर मार्गे येणारी-जाणारी वाहने या चौकातून वळतात. रस्त्याने येणारी वाहने भरधाव जातात. त्यांच्या अनियंत्रित वेगामुळे अनेकदा अपघात होतात.
बारामती -फलटण रस्त्यावर रस्ते अपघातात झालेली वाढ चिंताजनक असून अवघ्या महिनाभरात ठिकठिकाणी झालेल्या अपघातांत अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. दुचाकीवरून निघालेल्या जोडप्याची सांगवी येथील मुख्य चौकात वळण घेऊन समोरून आलेल्या रिक्षाला धडक देऊन झालेल्या अपघातात टँकर चालकामुळे महिला थोडक्यात बचावली आहे.
बारामती -फलटण महामार्गावर सांगवीतील चौकात बुधवारी (दि. १३ ) रोजी दहा वाजण्याच्या सुमारास फलटण तालुक्यातील पूसेगाव वरून दुचाकीवर बारामतीकडे निघालेले मध्यम वयाचे जोडपे मुख्य चौकातील सांगवी गावातून वळण घेऊन समोरून आलेल्या रिक्षाला जोरदार धडकले. यावेळी हे जोडपे उडून खाली पडले. त्यावेळी वाहन चालक पती एका बाजूला उडून पडला. तर मागे बसलेली पत्नी बारामतीवरून फलटणच्या दिशेने समोरून भरधाव आलेल्या टँकर समोर उडून आडवी गेली. यावेळी प्रसंगावधान दाखवत टँकर चालकाने ब्रेक दाबून ट्रक जागेवर थांबला गेला. यावेळी टँकर व महिलेच्या मध्ये काही इंचभर अंतराचा फरक राहिला.
यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला गेला. यावेळी वाहन चालकाच्या कानाला गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात होत होता. तर महिलेच्या कपाळावर मार लागून रक्तस्त्राव झाला. यावेळी अपघात होताच क्षणी संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष राहुल तावरे,सुधीर तावरे,संतोष जगदाळे यांच्यासह गावातील तरुणांनी या गंभीर दुखापत झालेल्या जोडप्याला शेजारीच असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचारकामी दाखल केले होते. मात्र,या गंभीर अपघातात हे जोडपे सुखरूप असल्याचे पाहून ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला.