पुणे : ‘जागा विकायची आहे,’ असे सांगून महिलेची एक कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी प्रसाद खैरे (वय ४०, रा.बिबवेवाडी), शुभम गिरीश भोसले (वय २९, रा.वडगाव शेरी), गिरीश भोसले (वय ५५, रा.वडगाव शेरी), ॲडव्होकेट संजय तानाजी मोरे (वय ५०, रा.बिबवेवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला.
सिंहगड रस्ता परिसरात राहणाऱ्या ५८ वर्षीय महिलेने मंगळवारी (दि. ३०) फिर्याद दिली आहे. हा प्रकार २०२० ते २९ जानेवारी २०२४ यादरम्यान घडला आहे. प्रसाद खैरे यांची १ कोटी ३५ लाखांची विकायची असल्याचे महिलेला सांगितले. जागेचे टायटल क्लीअर असल्याचे सांगून ॲड.संजय मोरे याच्याशी संगनमत करून खोटा नोटराइज दाखला तयार केला. या दाखल्याची झेरॉक्स महिलेला देऊन जागेच्या व्यवहारासाठी महिलेकडून वेगवेगळी कारणे सांगून एकूण १ कोटी ३५ लाख रुपये घेतले.
महिलेने पैसे प्रसाद खैरे याच्या बँकेच्या कर्ज खात्यात भरले. त्यानंतर, प्रसाद खैरे याने ९५ लाख रुपये परस्पर काढून घेतले. ही बाब महिलेला समजताच महिलेने पोलिसांना अर्ज दिला. त्यानंतर, आप-समजुतीचा करारनामा करून महिलेला तीस लाख रुपये परत केले. त्यानंतर, शुभम याने जादा बांधकाम करू, असे सांगून महिलेकडून पैसे घेतले. मात्र, बांधकाम न करता महिलेची फसवणूक केली. आरोपींनी संगनमत करून महिलेची एकूण १ कोटी ५ लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी वकिलासह चौघांवर गुन्हा दाखल करून प्रसाद खैरे व शुभम भोसले याला अटक केली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक सय्यद करत आहेत.