पुणे : हाॅटेल व्यवसायात भागीदारीच्या आमिषाने महिलेची ८७ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. सुजान संपत केदारे (३४, रा. महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड, येरवडा) असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत एका महिलेने बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला आणि आराेपी केदारे ओळखीचे आहेत. पीसमील हाॅस्पिटॅलिटी एलएलपी कंपनीचे राजा बहादूर मिल परिसरात बोटॉनिका ग्रीनबार रेस्टॉरंट आहे. केदारेने महिलेला हाॅटेल व्यवसायात भागीदारी देण्याचे आमिष दाखवले होते.
२०२१ पासून २०२२ पर्यंत सुजान याने महिलेकडून वेळोवेळी ८७ लाख ४७ हजार ६० रुपये घेतले. महिलेने पैसे देऊनही तिला भागीदारी दिली नाही. यात फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिस उपनिरीक्षक रवींद्र गावडे तपास करत आहेत.