पुणे : नवीन व्यवसाय करण्यासाठी माहेरहून पैसे न आणल्यामुळे सासरकडच्यांनी सुनेचा छळ करीत, तिच्या चारित्र्यावर संशय घेत शारीरिक व मानसिक त्रास दिला. त्यामुळे छळास कंटाळून महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना ७ आॅगस्टला वाघोलीतील दुबेनगरमध्ये घडली.
कोमल रूपेश ऊर्फ अंकुश अशोक इंगवले (वय २९) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. त्यांचा भाऊ ओंकार नखाते यांनी पती आणि इतर नातेवाईकांच्या विरोधात लोणी कंद पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
कोमल आणि रूपेश यांचा जून २०१९ मध्ये विवाह झाला होता. लग्नानंतर रूपेश आणि त्याच्या नातेवाईकांनी कोमलला माहेरहून पैसे आणण्यास सांगितले. चारित्र्यावर संशय घेऊन तिचा शारीरिक व मानसिक छळ केला जात होता. या सततच्या त्रासाला कंटाळल्याने कोमलने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक शिवशांत खोसे तपास करीत आहेत.
----