पुणे : पत्नी आजारी असल्याचे सांगून त्याने पैसे मागितले. धुणे भांडे करणाऱ्या एका महिलेने आपल्या पॉलिसी मोडून प्रसंगी दुसऱ्यांकडून उसने पैसे घेऊन त्याला मदत केली. थोडे थोडे करुन ५ लाख रुपये दिले. आता दोन वर्ष होत आली तरी तो पैसे परत करण्यास टाळाटाळ करु लागला. दुसऱ्याचे पैसे देण्याचा तणाव आणि पैसे मागितले तर पोलिसांची देत असलेली धमकी यामुळे तिने स्वत:चेच आयुष्य संपविण्याचा निर्णय घेऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. अतीशय करुण असा हा प्रकार जुन्या वडारवाडीत नुकताच घडला.
सुरेखा रामदास मते (वय ५२, रा. जुनी वडारवाडी) असे या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तिच्या १९वर्षाच्या मुलीने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अनिल तुकाराम लोखंडे (रा. बिबवेवाडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार वडारवाडीतील जुनी वडारवाडी येथे १६ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ८ वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दरमहा ५ ते १० टक्के व्याजाने सावकार लोकांना पैसे देतात. त्यांनी व्याजाला जरी उशीर केला तरी त्यांच्याकडून दंड म्हणून मोठी रक्कम वसुल करतात. शिवाय मारहाण, गहाण ठेवलेल्या वस्तू परस्पर विकण्याचे प्रकार नेहमीच समोर येतात. पण, इथे मदत केलेल्या महिलेलाच धमकाविण्याचा प्रकार घडला आहे.
सुरेखा मते या धुणे भांडी करत होत्या. त्यातून त्यांनी काही पैसे साठवले होते. अनिल लोखंडे याने आपली पत्नी आजारी असल्याचे सांगून त्यांच्याकडून वेळोवेळी ५ लाख पैसे घेतले. त्यासाठी पॉलिसी मोडल्या. दुसर्यांकडून उसने पैसे घेऊन लाेखंडे याला दिले. त्याला दीड, दोन वर्षे होत आली. पण, लोखंडे पैसे देण्याची टाळाटाळ करु लागला. ते पैसे वेळोवेळी परत मागितले असता त्याने ते परत केले नाही. तसेच पैसे मागितल्यास पोलिसांकडे तक्रार करीन, अशी धमकी दिली. त्यांनी दुसर्याकडून घेतलेले पैसे परत देण्याचे त्यांच्यावर दडपण होते. हा मानसिक त्रास सहन न झाल्याने शेवटी त्यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड तपास करीत आहेत.