पुणे : लग्नाचे आमिष दाखवून गिफ्ट पाठवण्याच्या बहाण्याने महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मनेकखरे वबिम लादेवी नावाच्या व्यक्तीवर शनिवारी (दि. २२) वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत कर्वेनगर परिसरात राहणाऱ्या एका ३५ वर्षीय महिलेने पोलिसांना फिर्याद दिली आहे. १२ नोव्हेंबर रोजी हा प्रकार घडला आहे. फिर्यादी महिला आणि आरोपी यांच्यात सोशल मीडियावर ओळख झाली. काही दिवसांनी त्यांचे व्हॉट्सॲप कॉलवरून बोलणे वाढले. मैत्रीचे रूपांतर प्रेमात होऊन आरोपीने महिलेला लग्न करण्याचे आमिष दाखवले. महिलेचा विश्वास संपादन करून कॅनडाहून तुझ्यासाठी गिफ्ट आणले असल्याचे सांगितले. त्यानंतर गिफ्ट विमानतळावर पाठविले आहे, पण कस्टम ड्यूटीमुळे ते भारतात आणण्यास अडचणी येत असल्याचे सांगून महिलेकडून पैसे मागितले. त्याच्यावर विश्वास ठेवून टप्प्याटप्प्याने महिलेने ६ लाख ७५ हजार रुपये पाठवले. काही कालावधीनंतर पैसे संपले असल्याचे सांगितल्यावर आरोपीने महिलेला फोन करायचे बंद केले. ना गिफ्ट मिळाले ना गेलेले पैसे मिळाले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर महिलेने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक जगताप करत आहेत.