भोर (पुणे) :भोर-मांढरदेवी रोडवर दुचाकीवरील ज्येष्ठ महिला खड्ड्यात पडून गंभीर जखमी झाली असून, उपचारादरम्यान सुमन बळीराम थोपटे ( वय ६७) यांचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाल्याची घटना घडली.
भोर-मांढरदेवी रस्त्यावरून एका दुचाकीवरून सुमत बळीराम थोपटे या खानापूर गावी जात असताना शुक्रवारी ( दि. २८) सकाळी ९.३०च्या सुमारास दुचाकी गाडी खड्ड्यात आपटल्याने दुचाकीवरून पडून त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली. त्यांना उपचारांसाठी पुणे येथे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.
भोर-मांढरदेवी रस्त्यावरील मोठमोठे पडलेले खड्डे प्रवाशांचे जीवघेणे ठरू लागले असल्यामुळे या खड्ड्याचा नाहक त्रास चालकांना वाहन चालवताना सहन करावा लागत आहे. परिणामी या खड्ड्यांमुळे अनेकांना मणक्याच्या आजाराचा त्रास होऊ लागला आहे. लवकरात लवकर या मार्गावरील खड्डे भरण्यात यावेत, अशी मागणी ग्रामस्थ प्रवासी चालक करत आहेत.