मंचर : संततधार पावसामुळे घराची पडवी अंगावर कोसळून महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना जवळे (ता. आंबेगाव) गावच्या लायगुडेवस्तीत दुपारी दीडच्या सुमारास घडली. रंगुबाई धोंडीभाऊ काळे ( वय 46) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असून त्या गावच्या माजी सरपंच आहेत. याबाबतची माहिती पुढीलप्रमाणे जवळे गावच्या लायगुडेवस्तीत धोंडीभाऊ महादू काळे हे पत्नी रंगूबाई धोंडीभाऊ काळे, मुले अजय धोंडीभाऊ काळे, गणेश धोंडीभाऊ काळे, सून लक्ष्मी अजय काळे यांच्यासोबत राहतात. काळे यांचे कौलारू घर असून स्वयंपाकासाठी पडवी बांधलेली आहे. रंगुबाई धोंडीभाऊ काळे या दुपारी घरी थांबल्या तर इतर सर्वजण शेतात कामासाठी गेले होते. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पडवीत काम करत होत्या. त्यावेळी संततधार पावसामुळे भिजलेली पडवी कोसळली. पडवीचे साहित्य रंगुबाई धोंडीभाऊ काळे यांच्या अंगावर पडले. त्याखाली त्या दाबल्या गेल्या. धोंडीभाऊ काळे हे दुपारी जेवण्यासाठी घरी आले असता त्यांना घराची पडवी पडलेली दिसली. त्यावेळी शिवाजी कोंडीभाऊ लायगुडे यांच्या मदतीने रंगुबाई काळे यांना ढिगार्यातून बाहेर काढण्यात आले. सुरुवातीला त्यांना पारगाव येथील एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले. नंतर मंचर उपजिल्हा रुग्णालयात त्यांना उपचारासाठी आणले असता त्या उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रंगूबाई काळे यांच्या डोक्याला व कमरेला मार लागला होता.
भीमाशंकर कारखान्याचे संचालक बाबासाहेब खालकर, सतीश खालकर, रघुनाथ वाळुंज, महेश लोखंडे, अजित खालकर, सिताराम वाळूज, दिलीप लायगुडे आदी ग्रामस्थांनी मंचर उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. रंगुबाई काळे यांचे शवविच्छेदन करण्यात आले. मंचर पोलिसात याबाबतची नोंद घेण्यात आली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान मोडकळीस आलेल्या घरांमध्ये राहताना नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन तहसीलदार रमा जोशी यांनी केले आहे. रंगुबाई धोंडीबा काळे या जवळे गावच्या माजी सरपंच असून 2015 ते 2020 या काळात त्यांनी गावचे सरपंचपद भूषवले आहे.