आळेफाटा : पिंपरी पेंढार येथे ५० वर्षीय महिलेचा शुक्रवारी (दि.१०) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला. नानुबाई सीताराम कडाळे (रा.पिंपळदरी वानदरी, ता.अकोले) या राजेश प्रभाकर पडवळ यांच्या शेतात कामगार म्हणून काम करत होत्या. शुक्रवारी सकाळी नानुबाई या शेतातील बाजरीचे राखण करत असताना आठ वाजण्याच्या सुमारास बिबट्याने त्यांच्यावर हल्ला करत त्यांना ठार केले. हि घटना पिंपळवंडी- पिंपरी पेंढार रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या शेतात घडली. सदर घटनेची माहिती वनविभागाला कळवली असता वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या ठिकाणी बाजुलाच शेतात दोन बिबटे असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांनी जुन्नरच्या सर्व बिबट्यांना पकडण्यासाठी वनविभागाला आदेश द्यायला पाहिजे होते असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. येथील बिबटे हे नरभक्षक झालेले आहेत. दररोज बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू व्हायला लागले तर आम्ही घराबाहेर पडायचे कसे असा प्रश्न ग्रामस्थांनी यावेळी उपस्थित केला. दोन दिवसांपुर्वीच काळवाडी येथील रुद्र फापाळे या आठ वर्षीय मुलाचा सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. तसेच चार दिवसां पुर्वी पिंपळवंडी येथील एक तेवीस वर्षीय मुलगी बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेली होती.या घटना ताज्या असतानाच शुक्रवारी पुन्हा एकदा बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाल्याने जुन्नर तालुक्यात खळबळ उडाल आहे. काळवाडी, पिंपळवंडी परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरे लावलेले आहेत. पिंपळवंडी, काळवाडी, उंब्रज, पिंपरी पेंढार या परिसरात बिबट्यांची संख्या लक्षणीय वाढलेली आहे.