पुणे: माझे तुझ्यावर प्रेम आहे, तुझ्यासोबत लग्न करायचे आहे असे गोड बोलून एका ३४ वर्षीय महिलेवर वारंवार तिच्या इच्छेविरोधात बलात्कार केला. यातून महिला दोनदा गर्भवती राहिल्याने तिला व तिच्या ७ वर्षीय मुलाला जीवे मारण्याची धमकी देत गर्भपात केला. यानंतर पीडीतेच्या घरी जात अनेकदा तिला मारहाण करत बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून कोथरूडपोलिसांनी आरोपी दत्तात्रय सुरेश काळभोर (४३, रा. ओडिना जैन सोसायटी, एलएमडी चौक, बावधन) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. मात्र, गुन्हा दाखल होऊनही पोलिसांनी अद्यापही आरोपीला अटक न केल्याने याप्रकरणी संशय व्यक्त करण्यात येत आहे.
पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, २०२२ साली पीडितेची आणि आरोपी दत्तात्रय काळभोर याची एका मैत्रिणीमार्फत ओळख झाली. यानंतर दत्तात्रय याने वारंवार पीडितेला मला तु खूप आवडते, मी तुझ्याशी लग्न करेन असे आमिष दाखवले. यावर पीडितेने त्याला नकार देत माझी व माझ्या नवऱ्याची घटस्फोटासंदर्भात केस सुरू आहे, तुमचे देखील लग्न झाले आहे, तर तुम्ही मला मला लग्नाबाबत कसे विचारता असे म्हणत नकार दिला. यावर आरोपी दत्तात्रय काळभोर याने मी देखील माझ्या बायकोला घटस्फोट देणार असून, त्यानंतर तुझ्याशी लग्न करीन असे आश्वासन दिले.
यानंतर आरोपीने पीडित महिलेला बाणेर परिसरातील हॉटेल नेत शारीरिक सुखाची मागणी केली. यावेळी पीडितेने विरोध केला असता, मी तुझी समाजात बदनामी करेन व तुझ्या मुलाला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी देत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर वारंवार आरोपीने शरीर संबंध ठेवल्याने पीडिता दोनदा गर्भवती राहिली. यानंतर आरोपीने पीडितेला दोनदा कोथरूड परिसरातील हॉस्पिटलमध्ये नेत तिचा गर्भपात केला.
रुग्णालयाच्या कागदपत्रांवर पीडितेच्या मयत वडिलांच्या नावाने खोट्या सह्या देखील केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकारानंतर पीडितेने आरोपीकडे लग्नाबाबत विचारणा केली असता, तिला उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पीडितेने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून २० दिवस उलटूनही आरोपी दत्तात्रय याला अटक केली नसल्याने पोलिसांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याची भावना पीडितेने व्यक्त केली. याप्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रेमा पाटील या करत आहेत.