लोकमत न्यूज नेटवर्क
वडगाव कांदळी : जुन्नर तालुक्यात, हिवरे खुर्द येथील एका महिलेने पाच वर्षांपूर्वी दोन जुळ्या बाळांना जन्म दिला होता. त्यानंतर सोमवारी सकाळी या महिलेने पुन्हा तीन बाळांना जन्म दिला असून, बाळ व आई सुखरूप असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. या घटना ऐकून परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
हिवरे खुर्द येथील ज्योत्स्ना विठ्ठल वायकर यांनी पाच वर्षांपूर्वी दोन जुळ्या बाळांना जन्म दिला होता. त्यानंतर त्यांना पुन्हा गर्भधारणा होत नव्हती. मात्र, त्यांना त्यांच्या एका नातेवाईकांनी जुन्नरमधील ‘श्री हाॅस्पिटल’ या ठिकाणी जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर ते उपचारासाठी त्या ठिकाणी गेले असता त्यांना डाॅ. अविनाश पोथरकर व डाॅ. मुक्तांजली पोथरकर यांनी दिलासा देऊन होमिओपॅथी उपचार सुरू केले. या उपचाराने त्या पुन्हा गरोदर राहिल्या. त्यानंतर त्यांनी दोन वेळा सोनोग्राफी केली. त्यांना सोनोग्राफीत तीन मुले असल्याचे आढळून आले. त्यामुळे डाॅक्टरांची चिंता वाढली होती.
डाॅ. अविनाश पोथरकर व डाॅ. मुक्तांजली पोथरकर यांनी त्यांच्या अभ्यासानुसार होमिओपॅथीचे उपचार पुढे तसेच सुरू ठेवले व त्यानंतर ज्योस्त्ना यांना बाळंतपणासाठी डाॅ. पोथरकर यांनी रुग्णालयात दाखल करून घेतले. सोमवारी (दि. २१) सकाळी ज्योस्त्ना यांनी तीन बाळांना सुखरूप जन्म दिला. यामध्ये २ मुले, १ मुलगी आहे. सर्व बाळांची वजने दोन किलोपेक्षा जास्त आहे.
चौकट
दुर्मीळ घटना
एकाच वेळी तीन बाळांना जन्म देणारी ग्रामीण भागातील ही दुर्मीळ घटना आहे. बाळ व बाळंतीण सुखरूप असल्याचे डाॅ. पोथरकर यांनी सांगितले. या बाळांना व बाळाच्या आईला सुखरूप ठेवण्यासाठी डाॅ. अविनाश पोथरकर व डाॅ.मुक्तांजली पोथरकर यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केली.