पुणे : निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या विरोधात तृप्ती देसाई यांनी तक्रार अर्ज दिला आहे. त्याच देसाई यांच्या विरोधात आता कोथरूडमध्ये महिलेने पोलिसात धाव घेतली असून धार्मिक भावना दुखावल्याबद्दल तक्रार अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आता कोथरूड पोलीस काय पवित्रा घेतात हेच बघावे लागणार आहे. अनुराधा पाटील असे तक्रार देणाऱ्या महिलेचे नाव आहे.
५ फेब्रुवारी रोजी नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या कीर्तनाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून समर्थक आणि विरोधक असे दोन गट पडले आहेत.देसाई यांनी विरोधी भूमिका घेतली असून आज त्यांनी अहमदनगर येथे जाऊन तक्रार दाखल केली आहे. त्याच देसाई यांच्या विरोधात पुण्यातील पाटील यांनी कोथरूड पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज दिला आहे.
याविषयी त्यांनी सांगितले की, आमच्यासाठी इंदोरीकर महाराज हे आदरणीय आहेत. त्यांनी केलेले वक्तव्य आम्हाला गंभीर वाटत नाही. देसाई या प्रसिद्धीसाठी त्यांच्यावर आरोप करत आहेत. त्यांच्या विरोधात इंदोरीकर यांनी तक्रार दाखल नाही केली तरी त्यांचे समर्थक म्हणून आम्हाला ती करण्याचा अधिकार आहे आणि म्हणून आम्ही कोथरूड पोलिसांना अर्ज दिला आहे.