लोणी काळभोर : एका विधवा महिलेला फेसबुकवर मित्र बनवून तिला भेटवस्तू पाठविल्याचा बहाणा करून तिच्याकडून तब्बल सव्वा तीन लाख रुपये लुबाडल्याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : रुक्मिणी प्रकाश देवकाते (वय ३०, रा. आश्रमरोड, उरुळी कांचन, ता. हवेली) यांच्या पतीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे त्या आईवडील, भाऊ व मुलगा यांच्यासह राहतात आणि उदरनिर्वाहासाठी इंदापूर येथील एका रुग्णालयात नोकरी करतात. आॅक्टोबर २०१८ मध्ये त्यांना फेसबुकवर बॉबी डोनटास या नावाने एक फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. ती स्वीकारल्यानंतर त्या व्यक्तीने त्याचा व्हॉट्सअॅप नंबर देवकाते यांना दिला. त्यानंतर दोघांची व्हॉट्सअॅपवर चर्चा सुरू झाली. त्यानंतर २४ नोव्हेंबर रोजी त्या व्यक्तीने देवकाते यांना पर्स, मोबाईल, सोन्याची चेन व २५ हजार पौंड भेट म्हणून कुरिअरद्वारे पाठवले आहेत, ते स्वीकार असे सांगितले.२६ नोव्हेंबर रोजी कुरियर आॅफिसमधून बोलत आहे असे सांगणाऱ्या लायटन पुई नावाच्या महिलेने कुरियर आल्याचे सांगितले. ते कुरियर मिळण्यासाठी पंधरा हजार रुपये भरण्यास सांगितले. देवकाते यांनी मित्राशी चर्चा करून ते पैसे भरले. परत त्याच महिलेने कुरियरमधील पैशामुळे ४५ हजार रुपये भरण्यास सांगितले. देवकाते यांनी मित्राशी चर्चा करून तेही पैसे भरले. त्यानंतर परत एकदा त्या महिलेने २५ हजार पौंड भारतीय चलनात रुपांतर करण्यासाठी ९५ हजार रुपये भरण्यास सांगितले. देवकाते यांनी फेसबुक मित्राशी चर्चा करून तेही पैसेही भरले. परत त्या महिलेचा फोन आला की कुरियरचा टॅक्स भरण्यासाठी एक लाख ६८ हजार रुपये भरायला सांगितले. देवकाते यांनी मित्राशी चर्चा करून हे पैसेही भरले. नंतर परत एकदा त्या महिलेने सव्वा दोन लाख रुपये भरण्यासाठी देवकाते यांना फोन केला होता. त्या वेळी देवकाते यांनी सांगितले की, आता माझ्याजवळ पैसे नाहीत. आतापर्यंत ३ लाख २३ हजार रुपये भरले आहेत. परत तुम्ही सव्वा दोन लाख रुपये भरायला सांगत आहात. मला पार्सल नको, माझे पैसे माघारी द्या. या वेळीही देवकाते यांनी मित्राशी चर्चा केली. या वेळी त्याने २५ हजार रुपये भरण्यास सांगितले. परंतु, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी हे पैसे भरले नाहीत आणि लोणी काळभोर पोलीस ठाण्यात संपर्क साधून सदर दोन व्यक्तींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.फेसबुकवर अनेकवेळा अनोळखी लोकांकडून फ्रेंड रिक्वेस्ट येते. ती आपण स्वीकारल्यामुळे त्या अनोळखी व्यक्तीला आपली कौटुंबिक माहिती रोज अपडेट स्वरूपात कळत असते. आपण कधी गावाला जाणार परत कधी येणार, कुठे जाणार याची इत्थंभूत माहिती फेसबुक पोस्टवरून त्या व्यक्तीला मिळते. त्यामुळे अनोळखी व्यक्तीला फेसबुक फ्रेंड बनविण्याचे टाळा, असे आवाहन पोलिसांनी केली.
फेसबुक फ्रेंड बनून महिलेला सव्वातीन लाखांचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 1:49 AM