पुणे : नोकरी आणि लग्नाच्या आमिषाने एकाने महिलेवर बलात्कार केला. तसेच त्याची कोठे वाच्यता केल्यास संबंधित महिलेच्या मुलाला जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी अविनाश कुलकर्णी (वय ४०, रा. शिवणे) याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सिंहगड रोड येथील एका ३८ वर्षांच्या महिलेने फिर्याद दिली. ही घटना मार्च २००३ ते १३ एप्रिल २०२३ या कालावधीत स्वारगेट येथील एका हॉटेलवर घडली आहे.
अधिक माहितीनुसार, आरोपी कुलकर्णी हा एका सहकारी बँकेत नोकरी करतो. त्याच्या एका मित्राच्या माध्यमातून पीडित महिलेशी त्याचा परिचय झाला होता. महिलेला नोकरीची गरज होती. त्यावेळी त्याने महिलेला विश्वासात घेऊन नोकरी मिळवून देण्याचे आणि लग्नाचे प्रलोभन दाखविले. त्यानंतर त्यांच्यासोबत जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. हा प्रकार कोणाला सांगितल्यास त्यांच्या मुलाला जिवे मारून टाकण्याची धमकी दिली. तसेच लग्न न करता फिर्यादीची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हा प्रकार घडल्यानंतर फिर्यादीने याबाबत स्वारगेट पोलिसात धाव घेत तक्रार अर्ज दिला होता. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला.