पुणे : क्राईम पेट्रोल मालिकांमध्ये पोलीस शेवटी गुन्हेगारांपर्यंत पोहचतातच. पण हे लक्षात न घेता ती मालिका पाहून एकाने शितपेयातून झोपेच्या गोळ्या देऊन ओळखीच्या महिलेचा खून केला. दागिने चोरुन नेले. इथंही पोलिसांनी अवघ्या १० तासात आरोपीला जेरबंद केले.
किसन सीताराम जगताप (वय ४६, रा. नारळीचा मळा, ता. पुरंदर, जि. पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. सुनीता बाळू कदम (वय ४४, रा. वैदुवाडी, हडपसर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
याप्रकरणी सुनीता कदम हिच्या विवाहित मुलीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनीता कदम या आपली मुलगी व जावई यांच्यासह वैदुवाडी येथे राहत होत्या. सुनीता कदम यांचा कोणीतरी खून करुन त्यांचे अंगावरील दागिने, मोबाईल व ए टी एम कार्ड व इतर वस्तू असा ४६ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याचे रविवारी सकाळी आढळून आले. गुन्हे शाखेच्या युनिट ५ च्या पोलीस अंमलदारांना परिसरात एक संशयित आढळून आला. तसेच सुनीता कदम यांचा मोबाईल किसन जगताप याच्याकडे असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्याला पुरंदरमधून ताब्यात घेतले.
किसन जगताप हा हडपसर माळवाडीमध्ये २००९ मध्ये राहायला असताना त्याची सुनीता जगताप यांच्याबरोबर ओळख झाली होती. ते वरचे वर भेटत असत. किसन याच्या मुलीच्या लग्नासाठी त्याला पैशाची गरज होती. क्राईम पेट्रोल मालिका पाहून ३ महिन्यांपूर्वी त्याने खूनाचा कट रचला. ९ एप्रिल रोजी रात्री साडेअकरा वाजता त्याने शितपेयाची बाटली विकत घेतली. त्यात झोपेच्या गोळ्या टाकून त्या सुनीता यांना पाजले. त्यांना गुंगी असल्याचे दिसताच त्यांचे डोके भिंतीवर जोरात आपटले. बेशुद्ध अवस्थेत खाली पाडून तिचा खून केला. तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने, ए टी एम कार्ड, मोबाईल काढून घेतले. कपाटातील इतर वस्तू घरातील दिवाणावर अस्थाव्यस्त टाकून चोरीचा देखावा करुन तो पळून गेला होता. हा संवेदनशील गुन्हा पोलिसांनी १० तासात उघडकीस आणला. ही कारवाई पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहायक निरीक्षक कृष्णा बाबर, अंमलदार रमेश साबळे, महेश वाघमारे, आश्रुबा मोराळे, प्रमोद टिळेकर, प्रवीण काळभोर, विशाल भिलारे, अकबर शेख, दाऊद सय्यद, विलास खंदारे, पृथ्वीराज पांडुळे यांनी केली.