उंडवडी कडेपठार : गोजूबावी येथील महिला सरपंचासह ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचारी, ग्रामसेवकास ग्रामपंचायत सदस्याने शिवीगाळ व मारहाण केल्याचा प्रकार सोमवारी (दि. १९) घडला. याबाबत संबंधित ग्रामपंचायत सदस्यावर अॅट्रॅसिटी, विनयभंग, शासकीय कामात अडथळा आदी कलमांतर्गत बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सरपंच माधुरी भगवान कदम यांनी बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. कल्याण दामोदर आटोळे (रा. गोजूबावी, ता. बारामती) या सदस्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गोजूबावी ग्रामपंचायतीत सोमवारी मासिक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीपूर्वीच कल्याण आटाेळे हे तेथे आले. त्यांनी मागील महिन्यात झालेल्या खर्चाचे हिशोब मागितला. या वेळी ग्रामसेवक सतीश बाेरावके यांनी बैठक सुरू होऊ द्या, त्यावेळी हिशोब दाखवतो असे सांगितले. मात्र, आटोळे यांनी आताच हिशोब द्या, अशी भूमिका घेतली. तसेच अरेरावी करत ग्रामसेवकांना शिवीगाळ केली. संगणक परिचालक सचिन मगन गावडे यांनी आटोळे यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता, गावडे यांना मारहाण करत शिवीगाळ केली. हा प्रकार घडल्यानंतर ग्रामसेवक बोरावके व संगणक परिचालक गावडे गटविकास अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी बारामती येथे गेले. दरम्यान, आटोळे यांनी सरपंच माधुरी कदम यांचा हात पिरगळून, तुझी लायकी नाही सरपंच होण्याची, असे म्हणून मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. तसेच जातीवाचक शिवीगाळ केली. या प्रकारानंतर सरपंच माधुरी कदम, ग्रामसेवक सतीश बोरावके, संगणक परिचालक सचिन गावडे व कर्मचाऱ्यांनी बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर करत आहेत.
सहा महिन्यांतून पहिल्यादाच हे सदस्य मासिक बैठकीला आले होते. संबंंधित ग्रामपंचायत सदस्य वारंवार त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचे सदस्य निलंबित करण्याबाबत गटविकास अधिकाऱ्यांना प्रस्ताव देणार आहोत.
- माधुरी कदम, सरपंच, गोजूबावी