स्त्रीला खऱ्या अर्थाने सक्षम करण्यासाठी विविध सार्वजनिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग वाढविला पाहिजे. यासाठी लोकमतने ‘ती’चा गणपती’च्या माध्यमातून उचलले पाऊल खूप महत्त्वाचे आहे. लोकमतने प्रत्येक वेळी महिलांच्या विविध विषयांमध्ये नेहमीच पुढाकार घेतला आहे. त्यांचे प्रश्न उचलून धरण्यापासून विविध पुरवण्यांच्या माध्यमातून विविध समस्यांवर प्रकाश टाकला आहे. स्त्रीशिवाय हा समाज अपूर्ण आहे. त्यामुळे गणपतीदेखील ‘ती’चा गणपती नसून तिच्यामुळे गणपती आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यामुळे अशा सार्वजनिक उपक्रमांमध्ये ‘ती’चा सहभाग वाढल्यास समाज परिवर्तन होण्यास मदत होईल.आम्ही लहान असताना मुंबईत सोसायटीतील लहान मुलींनी एकत्र येऊन गणेश मंडळ स्थापन केले होते; तसेच भाऊ नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून आमच्या घरात आम्ही दोघी बहिणी मिळूनच गणपतीच्या प्रतिष्ठापनेपासून विसर्ज$$नापर्यंत सर्व सोपास्कर पार पाडत आलो आहे. अनेक घरांमध्येदेखील मुली, महिला पुढाकार घेतात; परंतु याला सार्वजनिक स्वरूप मिळाले पाहिजे. यासाठी लोकमतबरोबर अन्य सार्वजनिक गणेश मंडळांनीदेखील पुढाकार घेतला पाहिजे.आपल्या संस्कृती मध्ये वर्षानुवर्षे पूजेचा मान पुरुषांनाच मिळत आला आहे. पूजेची तयारी, नैवेद्याचा स्वयंपाक आदी कामांमध्ये स्त्रियांचा सहभाग असतो. धार्मिक विधींचा अधिकार मात्र पिढीजात पद्धतीने पुरुषांनाच दिला आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंत सर्व विधींमध्ये पुरुषच ही जबाबदारी पार पाडत आले आहेत. महिलांचा सहभाग फार नगण्य प्रमाणात पाहायला मिळतो. पूजाअर्चा, विधींपासून तिला डावलले जाते. परंपरांकडे पाहण्याचा दृष्टिकोन काळाच्या ओघात बदलणे गरजेचे आहे. पुण्यात एखादी प्रथा सुरू झाल्यावर तिला सर्वमान्यता मिळते. पुण्याच्या गणेशोत्सवाला आगळीवेगळी परंपरा आहे. या गणेशोत्सवाच्या माध्यमातून अनेक सामाजिक परिवर्तन करण्याचा प्रयत्न झाले आहेत. त्यामुळे या गणेशोत्सवानिमित्त विविध सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने करण्यात येणाºया देखावे व अन्य गोष्टींमधून स्त्रियांचे सामाजिक स्थान अधिक भक्कम करणारा ठरला पाहिजे. गेल्या काही वर्षांत सार्वजनिक जीवनात स्त्रियांचे स्थान दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे काही प्रमाणात स्त्री-पुरुष समानता वाढत आहे.परंतु, आजही स्त्रीला कौटुंबिक, प्रोफेशनल आणि सामाजिक जीवनात स्वत:ला सिद्ध करण्यासाठी लढावे लागते. अनेक वेळा तिची क्षमता असतानादेखील तिला एखाद्या पदासाठी, प्रमोशनसाठी जाणीवपूर्वक टाळले जाते. स्त्रीच्या काही शारीरिक, मानसिक मर्यादांमुळे तिली वेगळे पाडण्याचे प्रयत्न कुटुंब, समाजात अनेक वेळा होतात. अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये स्त्रीया नकोशा असतात; परंतु कोणतेही कार्य तिच्याशिवाय पूर्ण होऊच शकत नाही, याचीदेखील जाणीव ठेवली पाहिजे.संयुक्त राष्ट्र संघाने स्त्रीचा एकूण समाजातील मान, सन्मान वाढण्यासाठी, तिला तिचे अस्तित्व निर्माण करण्याची संधी देण्यासाठी सन २०३० पर्यंत प्रत्येक क्षेत्रात महिलांची संख्या पन्नास-पन्नास टक्के असली पाहिजे, असे निश्चित केले आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या विविध उपक्रम, योजना संयुक्त राष्ट्र संघातर्फे विविध देशांमध्ये राबविण्यात येत आहेत; परंतु पुरुषप्रधान संस्कृती असलेल्या आपल्यासारख्या देशामध्ये प्रत्येक क्षेत्रात महिलांना थेट पन्नास टक्के सहभाग देणे, तो वाढविण्यासाठी प्रयत्न करणे खूप मोठे आवाहन आहे. यासाठी लोकमतच्या ‘ती’चा गणपती सारखे सार्वजनिक उपक्रम खूप उपयोगी ठरतील.लोकमतच्या वतीने गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेला ‘ती’चा गणपती’ हा अत्यंत चांगला उपक्रम आहे. स्त्रीचे समाजातील स्थान, तिला मिळणारा सन्मान अशा उपक्रमांमुळे वाढण्यास मदत होत आहे. स्त्रीने स्वत:चे अस्तित्व निर्माण करण्यासाठी आर्थिक सक्षम असणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी लोकमतबरोबरच सर्वच सार्वजनिक गणेश मंडळांनी पुढाकार घेऊन जास्तीत जास्त महिलांचा सहभाग वाढविला पाहिजे, अशा सार्वजनिक उपक्रमांमुळे स्त्रियांचे सामाजिक स्थान अधिक भक्कम होईल, असे मत आमदार नीलम गोºहे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
‘स्त्री’ला समाजात सन्मानाने वागवले पाहिजे- नीलम गोऱ्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 1:53 AM