पुणे : पतीचे निधन झाल्यानंतर महिलेला मदत करुन तिचा विश्वास संपादन करुन दहा लाख रुपये घेतले. मात्र, शारीरिक संबंध ठेवले तरच पैसे परत करीन असे सांगून महिलेवर वेळोवेळी अत्याचार केले. यानंतरही आरोपीने पैसे न दिल्याने, पीडित महिलेने आरोपीच्या मुलाला सांगितले असता त्याने देखील जीवे मारण्याची धमकी देऊन आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २०२२ ते २१ फेब्रुवारीपर्यंत महिलेच्या राहत्या घरी व पुणे शहर व परिसरातील वेगवेगळ्या लॉजवर घडला आहे.
याबाबत ४६ वर्षीय महिलेने मंगळवारी (दि. २१) वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून हनुमंत लालु गोरगल (५६) आणि प्रतिक हनुमंत गोरगल (दोघे रा. मु.पो. केडगाव ता. दौंड, जि. पुणे) या पिता-पुत्रावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या ओळखीचे असून आरोपी हनुमंत हा महावितरण कंपनीत कामाला आहे. पीडित महिलेच्या पतीच्या निधनानंतर हनुमंत याने महिलेला मदत करुन त्यांचा विश्वास संपादन केला. पतीच्या निधनानंतर विम्याचे पैसे महिलेला मिळाले होते. या पैशांवर डोळा ठेवून आरोपीने घरगुती अडचण असल्याचे सांगून दहा लाख रुपये घेतले.
काही दिवसांनी महिलेने आरोपीकडे पैशांची मागणी केली असता त्याने गैरवर्तन करुन फिर्यादी यांचा विनयभंग केला. तसेच शारीरिक सुख दिले तरच पैसे परत करेन असे सांगून महिलेसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तसेच महिलेला वेगवेगळ्या लॉजवर नेऊन तिच्यासोबत संबंध प्रस्थापित केले. मात्र, त्यानंतरही हनुमंत याने पीडितेला पैसे दिले नाहीत. त्यामुळे महिलेने आरोपीच्या मुलाला सर्व हकीकत सांगून पैशांची मागणी केली.
त्यावेळी प्रतिक गोरगल याने पीडितेला जीवे मारण्याची धमकी देऊन पैसे देणार नसल्याचे सांगत धमकावल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संतोष सोनवणे करत आहेत.