पुणे - मिरज रेल्वे लोहमार्गाचे दुपदरीकरण सुरू आहे. या दुपदरीकरणाच्या कामावरील महिलेला नीरा - वाल्हे दरम्यान भरधाव रेल्वेने उडवले. या घटनेत महिलेचा जागीच मृत्यू झाला. उमा मायाराम बारकाईने (वय ४०) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
नीरा पोलीस दुरक्षेत्रातून मिळालेल्या माहितीनुसार मयत महिलेचे पती मायाराम तुकाराम बारे यांनी या प्रकरणी जेजूरी पोलीसात फिर्याद दिली आहे. सद्या रेल्वे लाईनच्या दुपदरीकरणाचे व नव्या कँबिनचे काम सुरु आहे. हे काम जेऊर रेल्वे गेटच्या आसपास कंत्राटी कामगार महिला व पुरुष करत होते. दुपारी १:२० च्या दरम्यान कामसुरु असलेल्या ठिकाणी साप निघाल्याचा आरडाओरडा झाला. सापाच्य भितीने महिला रेल्वे रुळावर गेली. त्याच वेळी वाल्हे येथून नीरेच्या दिशेने वेगात नीरा - वाल्हे दरम्यान रेल्वे मार्गावरील जेऊर गेट नं. २८ च्या जवळ वेगाने जाणाऱ्या रेल्वे गाडी नं. ०२६३० संपर्क एक्स्प्रेसने उमा यांना उडवले. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.