तळेघर : पिंपरगणे (ता. आंबेगाव) येथील महिलेची रुग्णवाहिकेमध्ये डिझेल नसल्यामुळे रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यामुळे प्रसूतीसाठी मोठ्या प्रमाणात हेळसांड झाली.
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील आहुपे खोऱ्यामध्ये असणाºया पिंपरगणे येथील एका महिलेला अचानक प्रसूती वेदना होऊ लागल्यामुळे तिचे पती मच्छिंद्र वडेकर यांनी दूरध्वनीद्वारे या भागात कार्यरत असणाºया अडिवरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाºयाशी संपर्क साधला असता, संपर्क होऊ शकला नाही. यानंतर पिंपरगणे येथील ग्रामस्थांनी अडिवरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या १०२ नंबरच्या रुग्णवाहिकेवर असणाºया ड्रायव्हरशी संपर्क साधला असता ‘गाडीमध्ये डिझेल नाही. ही गाडी पिंपरगण्यापर्यंतच येईल एवढेच डिझेल आहे; परंतु तेथून परत मागे येण्यासाठी गाडीमध्ये डिझेल नाही. त्यामुळे मी येऊ शकणार नाही,’ असे सांगितले. यानंतर महिलेच्या नातेवाईक व ग्रामस्थांनी इतरत्र गावामध्ये खासगी गाडीसाठी चौकशी केली असता खासगी वाहनही मिळाले नाही. या महिलेला प्रचंड वेदना सहन कराव्या लागत होत्या. शेवटी तिला प्रसूतीच्या मोठ्या प्रमाणात वेदना होऊ लागल्यामुळे या गावामध्ये उपलब्ध असणाºया जुन्या पिढीतिल अप्रशिक्षित महिलेकडून (ग्रामीण भाषेत तिला सुईण म्हणतात) प्रसूती करून घ्यावी लागली. यानंतर काही काळानंतर घोडेगाव येथील १०८ नंबरची रुग्णवाहिका आली; परंतु त्याअगोदरच या महिलेची प्रसूती झालेली होती.आंबेगाव तालुक्याच्या भीमाशंकर, पाटण व आहुपे या खोºयांमध्ये आदिवासी जनता डोंगर दºयाखोºयांमध्ये विखुरलेली आहे. या भागात आजारी पडल्यानंतर त्याचप्रमाणे प्रसूतीसाठी महिलांना १५ ते २० कि.मी. अंतरावर असणाºया दवाखान्यांमध्ये त्या रुग्णांना न्यावे लागते. केवळ वाहनाच्या अनुपलब्धतेमुळे रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होतात. वेळेवर उपचार न मिळालेल्या आदिवासी बांधवांना त्याचप्रमाणे प्रसूतीची माता व तिच्या बालकाला आपला जीव गमवावा लागल्याची उदाहारणेही घडलेली आहेत.या भागात आदिवासी जनतेच्या आरोग्यविषयक गरजा भागाव्यात, यासाठी शासनाने लाखो रुपये खर्च करून रुग्णालयाच्या इमारती उभ्या केल्या आहेत; परंतु त्या ठिकाणी काम करणारे अधिकारी व कर्मचारी तेथे निवास्थ न करता ४० ते ५० किलोमीटर अंतरावरील घोडेगाव, मंचर या ठिकाणी राहतात. या भागात नेमण्यात आलेले डॉक्टर व कर्मचारी निवासस्थानी राहतात किंवा नाही, वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध का उपलब्ध करून दिली नाही या सर्व गोष्टींची चौकशी व्हावी, अशी मागणी पिंपरगणे गावचे माजी उपसरपंच भीमा गवारी व आहुपे गावचे उपसरपंच शंकर लाघी यांनी केली आहे.