पुणे : जिद्द आणि कठोर मेहनत करण्याची क्षमता असल्यास महिलांना कोणीही रोखू शकणार नाही. अशा महिलांच्या यशोगाथा पुढे आणून सर्व स्तरातील महिलांना व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे.आपल्यातील क्षमतांचा उपयोग करून स्वत:च्या पायावर उभे राहण्याचे हे दिवस आहेत. महिलांमध्ये उद्यमशीलता आहे. उद्योग उभारण्याच्या दृष्टीने सरकार पायाभूत सुविधा आणि इतर उपक्रम राबवित आहे.अशावेळी कुटुंबीयांचा महिलांना पाठिंबा मिळाल्यास त्या अधिक सक्षम आणि स्वयंसिद्धा बनतील,असे मत अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले.शुक्ल यजुवेर्दीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळाच्या याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियानांतर्गत महिला दिनाच्या निमित्ताने स्वयंसिद्धा व युवा कलाकार आणि समाजभूषण पुरस्कारांचे वितरण मयूर कॉलनीतील बालशिक्षण मंदिराच्या सभागृहात अमृता फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होते. यावेळी प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, आमदार प्रा. मेधा कुलकर्णी, संस्थेचे अध्यक्ष उमाकांत जोशी, कार्याध्यक्ष विश्राम कुलकर्णी, दि. ना. जोशी, राजश्री देशपांडे व सुनेत्रा कुंभोजकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.समाजभूषण पुरस्कार शरद महादेव उपासनी यांना, सावित्रीबाई जोशी यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा स्वयंसिद्धा पुरस्कार औरंगाबाद येथील जयश्री जोशी यांना, तर मनोरमा कुंभोजकर स्मरणार्थ दिला जाणारा 'युवा महिला कलाकार पुरस्कार' पंडिता शमा भाटे यांना प्रदान करण्यात आला. अक्षया बोरकर, सायली भिडे, मंजूश्री सोमण, मेधा राजपाठक व सुजाता टिळक या युवा उद्योजिकांना सन्मानित करण्यात आले. अमृता फडणवीस म्हणाल्या, महाराष्ट्रातील स्टार्टअप हब म्हणून पुणे दुस-या स्थानावर आहेत. पुण्यापासून सिलिकॉन व्हॅलीपर्यंत मराठी माणूस मेहनतीने पुढे गेलेला आहे. पण त्याचा गाजावाजा होत नाही. आपले काम बोलले पाहिजे. अशा पुरस्कारातून प्रोत्साहन मिळते. लघु व मध्यम स्वरूपाचे व्यवसाय निर्माण होण्याची आवश्यकता आहे. मृणाल कुलकर्णी म्हणाल्या, आपल्या जन्माचे ध्येय ओळखले तर क्षितिज ठेंगणे होऊ शकते. आजची स्त्री कर्तृत्वान ओळखली जाते.अजून थोडी स्मार्ट व्हायला हवी. आजचा काळ महिलांसाठी चांगला आहे. एकमेकींना मदत करून पुढे जाऊया. घर दोघांचे असते ही भावना स्त्री-पुरुषांनी जोपासली पाहिजे. विश्राम कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले.सूत्रसंचालन मंजूषा वैद्य यांनी केले. जयंत कुलकर्णी यांनी आभार मानले.
कुटुंबाच्या पाठिंब्याने महिला अधिक सक्षम आणि स्वयंसिद्धा होतील : अमृता फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 9:44 PM
महिलांमध्ये उद्यमशीलता आहे. उद्योग उभारण्याच्या दृष्टीने सरकार पायाभूत सुविधा आणि इतर उपक्रम राबवित आहे. अशावेळी महिलांना कुटुंबीयांचा पाठिंबा मिळाल्यास त्या अधिक सक्षम आणि स्वयंसिद्धा बनतील,असे मत अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले.
ठळक मुद्देस्वयंसिद्धा, युवा कलाकार आणि समाजभूषण पुरस्कारांचे वितरणलघु व मध्यम स्वरूपाचे व्यवसाय निर्माण होण्याची आवश्यकता