चाकण : येथील नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाची आरक्षण सोडत खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी जाहीर झाल्याने नगराध्यक्षपदाचा पहिलाच मान महिलेला मिळणार आहे. हे पद खुल्याप्रवर्गासाठी असल्याने मोठी चुरस वाढली असून चाकणच्या इतिहासात नाव कोरण्यासाठी महिला नगराध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.२३ पैकी २२ प्रभागांची निवडणूक झाली असून १८ नंबरच्या प्रभागातील महिला प्रवर्गाची निवडणूक येत्या २९ नोव्हेंबरला होणार आहे. निवडणूक निकालानंतर शिवसेनेने ८, राष्ट्रवादीने ७, अपक्ष ६ व भाजपने एका जागेवर विजय मिळविला आहे.अपक्षांनी शिवसेनेला पाठींबा जाहीर केल्याने नगर परिषदेवर शिवसेनेचीच सत्ता येणार असे आमदार सुरेश गोरे यांनी सांगितले आहे. सर्वसाधारण महिला राखीव पदासाठी कोणतीही महिला अर्ज करू शकत असल्याने नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत चांगलीच चुरस वाढणार आहे. शिवसेनेकडे पूजा साहेबराव कड, हुमा जहीर अब्बास शेख, स्नेहल नितीन जगताप व अपक्ष निवडून आलेल्या मंगल विनोद गोरे अशा चार महिला सदस्या आहेत. अद्याप कुणाचेही नाव जाहीर केले नसून, नगराध्यक्ष शिवसेनेचीच होईल व त्यासाठी सर्व अपक्ष निवडून आलेल्या उमेदवारांशी चर्चा करूनच निर्णय घेण्यात येईल, असे आमदार गोरे यांनी सांगितले आहे. भाजपमधून निवडून आलेल्या सुरेखा मनोहर गालफाडे या कुणाला पाठींबा देणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. राष्ट्रवादीकडे मेनका सागर बनकर, संगीता दत्तात्रय बिरदवडे, वृषाली योगेश देशमुख, अनिता दिलीप कौटकर, अश्विनी प्रकाश लांडे, स्नेहा वसंत भुजबळ या ६ महिला सदस्य असून राष्ट्रवादीचे ७ उमेदवार निवडून आलेले आहेत. भाजप कोणामागे जाणार ? आणि अपक्ष उमेदवार राष्ट्रवादी सोबत जाणार का ? यावर राष्ट्रवादीची सत्ता अवलंबून आहे. (वार्ताहर)
चाकणच्या पहिल्या नगराध्यक्षपदाचा मान महिलेला मिळणार
By admin | Published: November 10, 2015 1:49 AM