वडगाव निंबाळकर : मासाळवाडी (ता. बारामती) नायकोबा देवाच्या यात्रेत मृत्यू झालेल्या त्या वृद्ध महिलेचा खून झाल्याचे उघड झाले आहे. हातउसने घेतलेले पैसे बुडविण्याच्या उद्देशाने खून करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. सुभद्रा ज्ञानोबा कोंढरे (वय ५३, रा. कोंढुर, ता. मुळशी, जि. पुणे) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत शशिकला चंद्रकांत मरगळे (वय ४५ रा.कोंढुर, ता. मुळशी, जि. पुणे) हिच्यावर वडगांव निंबाळकर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मयत महिलेचा मुलगा अतुल ज्ञानोबा कोंढरे (वय २९, रा. पुणे) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मासाळवाडीतील नायकोबा मंदिराजवळ २५ नोव्हेंबर रोजी अनोळखी महिलेचा मृतदेह आढळुन आला होता. वैद्यकीय तपासणीत पोटात विषारी औषध पेल्याने तिचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. आरोपी शशिकलाने सुभद्राला २४ नोव्हेंबर रोजी नायकोबाची यात्रा पाहण्यासाठी मासाळवाडीला आणले होते. तिने सुभद्राला विषारी औषध पाजून मारले. दरम्यान, सुभद्रा बेपत्ता असल्याने तिच्या नातेवाईकांनी पौड पोलीस ठाण्यात १ डिसेंबर रोजी तक्रार केली होती. त्यानंतर वडगाव पोलिस ठाण्यातील बेवारस मृत देहाबाबत पौड पोलिसांनी माहिती घेतली. फोटोवरून ती सुभद्रा असल्याचे तिच्या नातेवाईकांनी ओळखले. त्यानंतर पोलिसांनी शशिकला हिला ताब्यात घेतले. तिने खुनाची कबुली दिली.सुभद्राकडुन शशिकला हिने हात उसने पैसे घेतले होते. पैशासाठी सुभद्राने तगादा लावल्याने तिचा खून केल्याची कबुली आरोपी शशिकला यांनी दिली आहे. आरोपी महिलेला ४ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिश शिंदे करीत आहेत. (वार्ताहर)
पैसै बुडविण्यासाठी महिलेचा खून
By admin | Published: December 08, 2014 12:14 AM