लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कुटुबांचे संपुर्ण व्यवस्थापन गृहिणी करते. त्या अर्थाने ती उत्कृष्ट व्यवस्थापक. कुटुंब आणि नाते सांभाळून स्वतः च्या पायावर उभ्या राहिलेल्या कर्तृत्ववान महिलांचा सत्कार आणि कौतुक सोहळा ʻलोकमतʼने उद्या (ता. 23) आयोजित केला आहे. त्यानिमित्ताने ʻविमेन अचिवर्स ऑफ पुणेʼ या पुस्तकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. कुटुंब आणि समाजातील अनेकांचा आधारस्तंभ बनलेल्या या गुणी महिलांचा प्रवास ʻलोकमतʼने जवळून पाहिला आहे. त्यामुळे त्यांचा ''''लोकमत वूमन अॅचिव्हर्स अवॉर्ड’ देऊन गौरव केला जाणार आहे. यावेळी सामान्य ते असामान्य अशा प्रवासातील कार्यरत स्त्रियांची दखल घेणारा, त्यांना सन्मान आणि अभिमान याची जाणीव देणारा हा सोहळा आहे. पंखातील बळ, जबर महत्त्वाकांक्षा आणि अविरत कष्टाच्या जोरावर आज या महिलांनी यशोशिखर गाठले. कुटुंबांचे व्यवस्थापन हे अत्यंत जिकीरिचे काम असताना महिला ती जबाबदारी लिलया पेलतात. खाचखळग्यांनी पुरेपूर भरलेल्या अशा या वाटेवर त्यांनी स्वत:च स्वत:चा मार्ग तयार केला. आज या कर्तृत्ववान महिलांची गगनभरारी अमर्यादित असून, इतरांना अचंबित करणारी आणि प्रेरणा देणारीही आहे. त्यांचा हा यशस्वी प्रवास, यशोगाथा निश्चितच अनेक धडपडणाऱ्या तरुणींना नकळत प्रेरणा देऊन जाईल. त्यांच्याकडे पाहून अनेकींना नवी आशा दिसते. त्यामुळेच तर त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास अवघ्या जगासमोर आणण्यासाठीचा हा एक कौतुक सोहळा आहे. हा कार्यक्रम केवळ निमंत्रितांसाठीच असून, सन्माननीय अतिथींनी कार्यक्रमस्थळी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
(फोटो : नीलम गोऱ्हे, वंदना चव्हाण,सुनेत्रा पवार, सोनाली कुलकर्णी)