सोमेश्वरनगर: प्रत्येक ठिकाणी कायदा हा महिलांच्या बाजूने आहे; परंतु महिलांनीही काही मर्यादा पाळणे गरजेचे आहे. त्यासाठी महिलांचा बळी जाता कामा नये, असे मत अॅड. स्नेहा भापकर यांनी व्यक्त केले. सोेमेश्वरनगर (ता. बारामती) येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व सोमेश्वर विज्ञान महाविद्यालय अंतर्गत विद्यार्थी कल्याण मंडळाच्या वतीने महिला व्यक्तिमत्त्वविकास शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी अॅड. भापकर बोलत होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपप्रज्वलन करून सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. हे शिबिर तीन सत्रांमध्ये आयोजित करण्यात आले होते. पहिल्या सत्रात अॅड. स्नेहा भापकर यांचे ‘कायदा आणि आम्ही’ या विषयावर, दुसऱ्या सत्रात प्रियंका भोसले यांचे ‘नवचेतना’ या विषयावर, तर तिसऱ्या आणि शेवटच्या सत्रात डॉ. अर्चना सस्ते यांचे ‘आरोग्य आणि व्यक्तिमत्त्वविकास’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. दुसऱ्या सत्रात प्रियंका भोसले यांनी नवचेतना या विषयावर मुलींना स्वत:मध्ये असलेल्या ऊर्जेची माहिती दिली. तसेच स्वत:चे आत्मपरीक्षण केल्याने आत्मविश्वास वाढतो, असे सांगितले. तिसऱ्या सत्रात डॉ. अर्चना सस्ते यांनी आरोग्य आणि व्यक्तिमत्त्वविकास’ या विषयावर बोलताना मुलींनी मानसिक दृष्टीने कसे सक्षम आणि सशक्त राहायचे याबाबत मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन प्रा. आदित्य काळे यांनी केले, तर आभार विद्यार्थी कल्याण मंडळाचे अधिकारी अजित जगताप यांनी मानले. अध्यक्षस्थानी प्राचार्य धनंजय बनसोडे होते. या वेळी प्राचार्य एस. के. हजारे, डॉ. ए. ए. कुलकर्णी, भारत खोमणे, अजित जगताप, प्रा. राजेश निकाळजे उपस्थित होते. (वार्ताहर)
महिलांनीही मर्यादा पाळणे गरजेचे
By admin | Published: December 23, 2016 12:08 AM