पुणे : शहरातील गोरगरीब व सर्वसामान्य रुग्णांना कर्करोग (कॅन्सर) सारख्या गंभीर आजारांवर अल्पदरात उपचार उपलब्ध होण्यासाठी महापालिकेच्या वतीने पीपीपी अथवा बीओटी तत्त्वावर स्वतंत्र कॅन्सर हॉस्पिटल उभारणार आहे. महिला व बालकल्याण समितीच्या बुधवारी (दि. २६) झालेल्या बैठकीत कॅन्सर हॉस्पिटल उभारण्यास मंजुरी देण्यात आली.सध्या महापालिकेच्या वतीने शहराच्या विविध परिसरात वेगवेगळ्या आजार व रोगांचे निदान करण्यासाठी स्वतंत्र अशी हॉस्पिटल आहेत. परंतु कर्करोगाचे निदान व उपचारासाठी स्वतंत्र हॉस्पिटल नसल्याने सर्वसामान्य व गरीब रुग्णांची अडचण होते. यामुळे नगरसेवक सम्राट थोरात आणि विशाल धनकवडे यांनी महापालिकेच्या वतीने शहरात स्वतंत्र कॅन्सर हॉस्पिटल सुरू करावे, असा प्रस्ताव महिला व बालकल्याण समितीसमोर ठेवला होता. याबाबत समितीने प्रशासनाकडून अभिप्राय मागविला होता. यामध्ये गेल्या काही वर्षांत भारतात कॅन्सरचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून, दर वर्षी ८ लाखांपेक्षा अधिक व्यक्तींना कर्करोग झाल्याचे स्पष्ट होते. यामध्ये वेळेवर निदान व योग्य उपचार न झाल्याने कर्करोगामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्यादेखील वर्षाला सुमारे पाच लाखांच्या घरात आहे.कर्करोग होण्याचे प्रमाण पुरुषांमध्ये अधिक असून, तोंडाचा, अन्ननलिका, जठर, फुप्फुस, प्रॉस्टेट या अवयवांचा कर्करोग होतो, तर महिलांमध्ये स्तनाचा, गर्भाशय, मुखाचा कर्करोग होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.पुणे शहरामध्येदेखील गेल्या काही वर्षांत कर्करोग रुग्णांची संख्या वाढत असल्याचे निदर्शनास आली आहे. शहरातील गरीब रुग्णांना कॅन्सरवर उपचारासाठी सध्या केवळ ससून एकमेव रुग्णालय उपलब्ध आहे. खासगी रुग्णालयाचे प्रचंड महागडे उपचार सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. परंतु एम.एम.सी. अॅक्टनुसार आवश्यक कर्तव्यानुसार कर्करोग हॉस्पिटलची सुविधा उपलब्ध करून देणे योग्य आहे.परंतु, यासाठी येणारा मोठा खर्च लक्षात घेता महापालिकेला परवडणार नाही. यामुळे पीपीपी अथवा बीओटी तत्त्वावर कर्करोग रुग्णालय उभारण्यास हरकत नसल्याचा अभिप्राय प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे बुधवारी झालेल्या महिला व बालकल्याण समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली.गरीब रुग्णांसाठी निर्णयगेल्या काही वर्षांत शहरातदेखील विविध प्रकारच्या कॅन्सरच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. परंतु गरीब व सर्वसामान्य रुग्णांना कॅन्सरचे योग्य वेळी निदान न झाल्याने व आवश्यक उपचार घेणे कठीण असल्याने आपला जीव गमवावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर महिला व बालकल्याण समितीत शहरात स्वतंत्र कॅन्सर हॉस्पिटल उभारण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे.- राजेश्री नवले, अध्यक्ष, महिला व बालकल्याण समिती
कॅन्सर हॉस्पिटल उभारणार , महिला व बालकल्याण समिती बैठकीत ठराव मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 2:52 AM