पुणे : शहरातील सर्व २७ दस्तनोंदणी कार्यालयांमध्ये शुक्रवारी (दि. ७) 'महिलाराज' असणार आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त नारी शक्तीचा सन्मान करण्याच्या उद्देशाने कार्यालयाचा संपूर्ण कारभार महिलांच्या हाती सोपविला जाणार आहे. तसेच सहजिल्हा निबंधक या शहराच्या प्रमुखपदीही महिलाच असणार आहे. गेल्या वर्षीही हा उपक्रम राबविण्यात आला होता.
दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये काम करणे आज तुलनेने आव्हानात्मक झाले आहे. हे आव्हानात्मक काम महिला सक्षमरित्या पूर्ण करू शकतात हे सप्रमाण सिद्ध करण्याच्या दृष्टीने हा आगळावेगळा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. याद्वारे महिलांना स्वतःचे कार्यकर्तृत्व दाखविण्याची अनोखी संधी मिळणार आहे. सहजिल्हा निबंधक तसेच दुय्यम निबंधक हवेली क्रमांक १ ते २७ या कार्यालयांचा तसेच विवाह अधिकारी पुणे जिल्हा या कार्यालयाचा कार्यभार शुक्रवारी (दि. ७) सर्व महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे सोपविला जाणार आहे, अशी माहिती सहजिल्हा निबंधक संतोष हिंगाणे यांनी दिली.सहजिल्हा निबंधक वर्ग १ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी पुणे शहर या पदाचा कार्यभार संगीता पठारे व सह जिल्हा निंबधक वर्ग २ या पदाचा कार्यभार राजश्री खटके या महिला अधिकाऱ्यांकडे देऊन कार्यालयामधील सर्व महिलांचा गौरव केला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून या कार्यालयाच्या अखत्यारित असलेली सहदुय्यम निबंधक हवेली क्र. १ ते २७ या कार्यालयातील वर्ग २ पदाचा कार्यभार महिला कर्मचाऱ्यांकडे सोपविण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. राज्याचे नोंदणी महानिरीक्षक तथा मुद्रांक नियंत्रक रवींद्र बिनवडे तसेच महिला व बालकल्याण आयुक्त नयना गुंडे यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या आहेत.