पुणे : पुणे रेल्वे स्टेशनवर झोपलेल्या महिलेकडील चार महिन्याच्या मुलाला पळवून नेऊन त्याच्यासोबत भीक मागणाऱ्या महिलेला लोहमार्ग पोलिसांनीमुंबईतून पकडले़. बुधवारी रात्री उशिरा बाळाला त्याच्या आईकडे सोपविण्यात आले़. लहान बाळ असेल तर जास्त भीक मिळते म्हणून तिने हे मुल चोरले होते़. मनीषा महेश काळे (वय २५, रा़ हडपसर रेल्वे स्टेशन झोपडपट्टी, मुळ भूतकरवाडी, भिंगार, अहमदनगर) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे़. याबाबतची माहिती पोलीस अधीक्षक तुषार पाटील यांनी दिली़.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगीता आनंद कंग (वय २५, रा़ कोपार्ड, ता़ करवीर, जि़ कोल्हापूर) या आपल्या चार महिन्याच्या मुलाला घेऊन १५ दिवसांपूर्वी पुण्यात आल्या होत्या़. १७ आॅगस्टला त्या पुणे रेल्वे स्टेशनवरील प्लॉटफॉर्म क्रमांक २ येथील बुक स्टॉलजवळ झोपल्या होत्या़. त्यावेळी रात्री सव्वा आठ ते मध्यरात्री बाराच्या दरम्यान त्यांच्या मुलाला कोणीतरी पळवून नेले़. हे लोहमार्ग पोलिसांना समजताच त्यांनी सीसीटीव्हीद्वारे शोधण्याचा प्रयत्न केला़. पण, त्यात पळवून नेणाऱ्या महिलेचे अस्पष्ट चित्र दिसले़. त्यानंतर पोलिसांनी पुणे स्टेशन परिसरातील सर्व भीक मागणाऱ्यांकडे चौकशी केली़. पुणे रेल्वे स्टेशन, दत्त मंदिर, मंडई परिसरात शोध घेतला जात होता़. त्यावेळी पोलीस कर्मचारी धनंजय गर्जे यांना खबऱ्यामार्फत ही महिला बाळासह बकरी ईदच्या दिवशी जोगेश्वरी येथील पुलाखाली भीक मागत असल्याचे सांगितले़. स्थानिक पोलिसांच्या मदतीने या महिलेला ताब्यात घेण्यात आले़. लोहमार्ग पोलिसांचे पथक तातडीने मुंबईला रवाना होऊन त्यांनी बाळासह ताब्यात घेऊन तिला अटक केली़. लहान मुले असेल तर जास्त भीक मिळते, या अनुभवावरुन तिने हे मुल चोरल्याचे पोलिसांना सांगितले़. संगीता कंग यांना तीन मुले असून त्या निराधार आहे़. तिने आपल्या दोन मोठ्या मुलांना बहिणीकडे ठेवून चार महिन्याच्या मुलाला घेऊन पुण्यात येऊन भीक मागत होत्या़. तिच्या पुनर्वसनासाठी रेल्वे पोलीस प्रयत्न करणार असल्याचे पोलीस अधीक्षक तुषार पाटील यांनी सांगितले़. ही कामगिरी पोलीस अधीक्षक तुषार पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी नंदकुमार घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल दबडे, सहायक निरीक्षक मंगेश जगताप, पोलीस कर्मचारी धनंजय गर्जे, विक्रम मधे, स्वप्नील कुंजीर, निलेश बिडकर, राजेश कोकाटे, प्रभा बनसोडे, अश्विनी येवले, मनीषा बेरड, सुधाकर जगताप यांनी केली़.
....................
गेल्या काही महिन्यात स्टेशन परिसरातून मुले पळविल्याची चौथी घटना स्टेशन परिसरातून मागील काही महिन्यात मुल पळवून नेल्याच्या चार घटना घडल्या आहेत. फेब्रुवारी २०१८ मध्ये ८ महिन्याच्या मुलीला रंजना पांचाळ (रा. वाल्हेकर वाडी, पिंपरी) हिने पळवले होते. तिला मुल नसल्याने तिने मुलाचे अपहरण केल्याची माहिती उघडकीस आली होती. जुलै २०१८ मध्येही लहान मुलास पळवून नेण्याची घटना घडली होती. तसेच एक लहान मुलगा रेल्वेत बसून परभणी येथे गेला होता. या सर्व गुन्ह्यात मुलांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. ................................भीक मागण्यासाठी लहान मुलांचा वापर केल्यास जास्त भिक मिळते. त्यामुळे आरोपी लहान मुलांचे अपहरण करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यास लहान मुलांच्या आई वडिलांचा निष्काळजीपणा कारणीभूत ठरला आहे. दरम्यान, हरवलेले तसेच सापडलेल्या मुलांबाबत ह्यट्रक द मिसिंग चाईल्ड या संकेतस्थळावर माहिती द्यावी म्हणजे मुल सापडण्यास मदत होवू शकते.- तुषार पाटील ( पोलीस अधिक्षक, पुणे लोहमार्ग )