पुणे : सिंहगड रोड परिसरातील नगरसेविका ज्योती किशोर गोसावी यांच्या घराच्या उघड्या दरवाजातून प्रवेश करुन ९ तोळे सोन्याचे दागने लंपास करणारी महिला सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. तिच्यासह चोरीचे दागिने घेणाऱ्या सराफाला सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली आहे़ हर्षा सुरेश शितोळे (वय ५३, रा़ पर्वती निवास, हिंगणे खुर्द) आणि सराफ कामाक्षी जेम्स अँड ज्वेलर्सचे मालक देवराय गणपती रेवणकर (वय ६५, रा़ शनिवार पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़ याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योती गोसावी (रा़ पार्थ बंगला, हिंगणे खुर्द, सिंहगड रोड) यांच्या घराच्या आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करीत असताना एक संशयित महिला तोंडाला रुमाल बांधून फिरत असल्याचे निदर्शनास आले. तोंडाला रुमाल बांधलेला असल्याने तिचा शोध घेण्यात अडचणी येत होत्या़ तरीही सर्व शक्यता गृहीत धरुन आजूबाजूच्या सुमारे २ किमी परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पडताळणी करीत असताना पोलीस कर्मचारी दत्ता सोनवणे, राहुल शेडगे यांना मिळालेल्या माहितीवरुन हर्षा शितोळे हिनेच चोरी केल्याचे निष्पन्न झाले. तिला अटक केल्यावर तिने गुन्ह्याची कबुली दिली़. हर्षा शितोळे हिचेवर पूर्वी पुणे शहरात विविध पोलीस ठाण्यात सुमारे १५ गुन्हे दाखल असून ती चोरीच्या गुन्ह्यात २ वर्षे शिक्षा भोगून आलेली आहे. तिच्याकडून चोरीचे सोने विकत घेणारे कामाक्षी जेम्स अँड ज्वेलर्स या दुकानाचे मालक देवराय गणपती रेवणकर यांनाही अटक करण्यात आली आहे. ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ़ प्रवीण मुंडे, सहायक पोलीस आयुक्त डॉ़ शिवाजी पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गिरीश सोनवणे तसेच कर्मचारी यशवंत ओंबासे, संतोष सावंत, सुनिल पवार, दत्ता सोनवणे, राहुल शेडगे, श्रीकांत दगडे, दयानंद तेलंगे पाटील, मयुर शिंदे, सचिन माळवे, निलेश कुलथे, वामन जाधव यांनी केली़.