पुणे : महिलांना विनोदबुद्धी नसते, अशी एक सर्वसाधारण धारणा असते, मात्र, खरे कारण हे आहे की, त्यांना विनोदाचा व्यवसाय करणे जमत नाही. महिलांचा विनोद सहजरीत्या स्वीकारला जात नाही, हेदेखील एक वास्तव आहे. जेव्हा स्त्री-पुरुष भेदापलीकडे जाऊन ‘माणूस’ म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाईल, तेव्हाच त्यांचा निखळ विनोद समजू शकेल, असे मत ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने गोडबोले यांच्या हस्ते कॉन्टिनेन्टल पुरस्कृत कै. चिं. वि. जोशी पुरस्काराने ज्येष्ठ लेखिका डॉ. प्रतिमा इंगोले यांना सन्मानित करण्यात आले, त्या वेळी त्या बोलत होत्या. या वेळी परिषदेच्या कार्याध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, परीक्षक श्याम भुर्के उपस्थित होते. आयुष्यात विपरीत काहीसे दचकून टाकणारे अनुभव आले, तरी हसून बघण्याशिवाय महिलेकडे काहीच पर्याय नसतो. विनोदबुद्धीशिवाय तिचे जगणे हे अशक्यच आहे. विनोद जगतच लेखनातून अभिव्यक्तीचे प्रकटीकरण ती करत असते. मात्र एक महिला जेव्हा विनोद मांडण्याचा प्रयत्न करते तेव्हा तो स्वीकारला जात नाही. महिलांकडून अशा विनोदाची अपेक्षा नाही, असे सांगून तिच्या लेखनाला नाकारले जाते. ज्या वेळी स्त्री-पुरूष भेदापलीकडे जाऊन ‘माणूस’ म्हणून तिच्याकडे पाहिले जाईल, तेव्हाच तिचा विनोद उमजू शकेल, असे सांगून गोडबोले यांनी निखळ विनोदाची व्याख्या स्पष्ट केली. रसिकांच्या प्रोत्साहन आणि प्रेमामुळेच लिहायला लागले, हा पुरस्कार माझे गुरू के. ज. पुरोहित यांना मी समर्पित करीत असल्याची भावना व्यक्त केली. डॉ. प्रतिमा इंगोले यांनी खास वऱ्हाडी भाषेतील ‘मुंदी’ ही कविता सादर करून उपस्थितांना हास्यकारंजात चिंब भिजविले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. कल्याणी दिवेकर यांनी केले.(प्रतिनिधी)
महिलांना विनोदाचा व्यवसाय जमत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2016 12:53 AM