पुणे : भारतात धर्म आणि जाती व्यवस्थेत स्त्रियांना कमी लेखले जात आहे. शंभर वर्षात स्त्रियांच्या मानसिकतेत बदल होत गेला. पण पुरुषांच्या झाला नाही. स्त्री आता स्वावलंबी झाली असून समानतेचा हक्क मागू लागली आहे, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले.
पत्रकार भवन येथे प्रियांजली प्रकाशन आयोजित डॉ. दिलीप देशपांडे लिखित त्रिरंग पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे, संगणक तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर, प्रियांजली प्रकाशनचे पराग लोणकर, चित्रा देशपांडे उपस्थित होते.
देशमुख म्हणाले, पूर्वीपासूनच पुरुषाला स्त्री गुलाम म्हणून हवी असते. आजच्या उच्चभ्रू वातावरणात पतीपासून पत्नीचा छळ होऊ लागला आहे. स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाण कमी झाले नाही. आधुनिक काळात त्याचे स्वरूप बदलले आहे. बलात्कारावर सिनेमा काढला जातो. त्यावेळी बलात्कार चांगला आहे. अशा प्रकारचे चित्र सिनेमातून दाखवले जाते. प्रत्येक जिल्ह्यात, राज्यात, देशात पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचे प्रमाण कमी आहे. स्त्री पुरुष समानता आजचा कळीचा प्रश्न बनला आहे. स्त्री आता सबला झाली. हेच या पुस्तकातून दिसून येते.
—
आपल्या देशासाहित प्रगत देशातही स्त्रीला दुय्यम स्थान दिले जात आहे. समाजात शिक्षित कुटुंबातही घटस्फोटाचे प्रमाण वाढत आहे. स्त्रियांना मिळणाऱ्या जास्त पगारावरून हे घडत आहे. पुस्तकातून स्त्रियांची योग्य बाजू मांडली आहे.
-दीपक शिकारपूर
—-
वैदिक काळात स्त्री मुक्त होती. पुरुषाच्या बरोबरीने कामे करत होती. तेवढी ती एकविसाव्या शतकात मुक्त नाही. महिलांवरील अत्याचारात सत्तर टक्के अत्याचार कुटुंबातच होत आहेत. त्रिरंग पुस्तक या सर्व गोष्टीबाबत विचार करायला लावते.
- डॉ. रामचंद्र देखणे
फोटो : डॉ. दिलीप देशपांडे लिखित त्रिरंग पुस्तकाच्या प्रकाशन समारंभ झाला. याप्रसंगी पराग लोणकर, डॉ. दीपक शिकारपूर, लक्ष्मीकांत देशमुख, डॉ. रामचंद्र देखणे, प्रा. मिलिंद जोशी, चित्रा देशपांडे उपस्थित होते.
(फोटो - त्रिरंग पुस्तक प्रकाशन नावाने)