पुणे : पीएमपी चालक आणि वाहकांच्या बाबतीतल्या तक्रारी नेहमीच आपण ऐकत असताे. बस थांब्यावर थांबवली नाही, बस चालवताना माेबाईल फाेनचा वापर केला किंवा प्रवाशांशी अरेरावीची भाषा वापरली. अशा तक्रारी नेहमीच पीएमपीकडे येत असतात. परंतु राजगुरुनगरहून भाेसरीला येणाऱ्या महिलेला पीएमपीच्या कर्मचाऱ्यांचा वेगळाच अनुभव आला. साेन्याचे दागिने आणि पैठण्या असा एकूण 20 हजारांचा ऐवज असलेली बॅग एक महिला बसमध्ये विसरली हाेती. ही बाब पीएमपीच्या वाहक आणि चालकांच्या लक्षात येताच त्यांनी ती बॅग आगारात जमा करुन त्या महिलेला परत केली.
राजगुरुनगरहून भाेसरीला जाणाऱ्या बसमध्ये रविवारी एका महिलेची दागिणे असलेली बॅग विसरली. ही बाब त्या बसचे वाहक किशाेर शिंदे आणि संभाजी केंद्रे यांच्या लक्षात आली. बस भाेसरीला येताच त्यांनी ती बॅग आगार प्रमुखांकडे जमा केली. काही वेळाने ती महिला बॅगच्या शाेधात आगारात आली. तेव्हा चालक आणि वाहकांनी ती बॅग त्या महिलेला सूपूर्त केली. पीएमपीच्या कर्मचाऱ्यांचा आगार व्यवस्थापर शांताराम वाघिरे यांनी सत्कार करुन त्यांचे काैतुक केले.