पुणे: राज्यात दिवसेंदिवस महिला, मुलींवर अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. पुण्यातदेखील एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर चाकूने हल्ला करून निर्घृण खून करण्यात आला. महिला व मुलींच्या अत्याचारावरील कायदा कडक करून सर्व तालुक्यांत पोलीस स्टेशनमध्ये महिला तक्रार निवारण कक्ष स्थापन करावे, अशी मागणी पुण्यातील संघटनांनी केली आहे. याबाबत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (balasaheb thorat) यांना भेटून निवेदन दिले.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री यांनी याबाबत आता कठोर पावले उचलण्याची गरज आहे. इतर देशाच्या धरतीवर महाराष्ट्रात कायदा कडक करावा. तसेच २१ दिवसांच्या आत आरोपींना फाशीची शिक्षा करावी. तरच यापुढे अशा घटना होणार नाहीत. याशिवाय अशाप्रकारचे गुन्हे करणाऱ्या आरोपींची माहिती एकत्र करून त्यांच्यावर तातडीने कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. रस्त्यावरील महिला आणि मुलांसाठी योग्य निवारा आणि पुनर्वसन यालाही प्राधान्य देणे आवश्यक आहे, अशी मागणी प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष सुरेखा ढवळे यांनी केली.
मुंबईतील साकीनाका येथील महिला अत्याचार, ससून हॉस्पिटलमधून तीन महिन्यांच्या मुलीला पळवणे, पुणे रेल्वे स्टेशनच्या आवारात सहा वर्षांच्या मुलीवर रिक्षाचालकाने केलेला अत्याचार, जुन्नर येथील आळेफाटा येथे १६ वर्षीय मुलीची फसवणूक करून तिच्यावर अत्याचार करून घरातील बावीस तोळे सोने लंपास केले; तर नुकतेच बिबवेवाडीत अल्पवयीन मुलींची झालेली हत्या या सर्व घटना संतापजनक आणि दुःखद आहे. अशा घटनांनंतर चर्चासत्रे होतात, राजकीय आरोप-प्रत्यारोप होतात, पण पुढे काहीच ठोस होत नाही, असे सुरेखा ढवळे म्हणाल्या.