पुणे : शहरातील अनेक महत्त्वाच्या रस्त्यावर सायंकाळ झाली की, ग्राहकांची वाट पाहत थांबलेल्या तरुणी, महिला दिसतात. त्यांच्याशी गुजगोष्टी करून काही जण त्यांना आपल्याबरोबर घेऊन जाताना दिसतात. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या सर्व तशाच असतात, असा गैरसमज अनेक जण करून घेताना दिसतात. त्याचा इतर महिलांना त्रास होऊ लागला आहे. कॅम्पातील ब्लू नाईल चौकाकडून रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका महिलेला हा अनुभव आला.
याबाबत येरवडा येथील एका ३३ वर्षांच्या महिलेने बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अधिक माहितीनुसार, फिर्यादी या बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास ब्लू नाईल चौकातून रेल्वे स्टेशनकडे पायी जात होत्या. पुना क्लबच्या गेटजवळ त्या आल्या असताना एक कार त्यांच्याजवळ आली. चालकाने काच खाली करून त्यांना शुकशुक करून बोलावले. फिर्यादी कारजवळ गेल्या. तेव्हा त्याने ‘‘चलती क्या तेरे को दोन हजार देता,’’ असे म्हणाला. त्यावर फिर्यादी यांनी ‘‘ए चल निघ येथून, मी तुला काय तशी वाटते का?’’ असे उत्तर दिले. यावर त्याने फिर्यादी यांना वाईट वाईट शिवीगाळ करून जोरात गाडी चालवत निघून गेला. पोलिस उपनिरीक्षक नळकांडे तपास करीत आहेत.