न्हावरे : न्हावरे (ता.शिरुर ) येथे शेतमजूर महिला मंगळवारी ( दि.३) रात्री शौचाला गेली असता अज्ञात व्यक्तीने तिच्यावर हल्ला करून तिचा एक डोळा काढला आहे. तर एका डोळ्याला अत्यंत गंभीर स्वरूपाची दुखापत केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.या घटनेत मुक्ता राजू चित्रे (वय ४५ वर्ष ,रा.बिडगर -सूर्यवंशी वस्ती, न्हावरे, ता. शिरुर) या महिलेवर अज्ञात हल्लेखोराने हल्ला करून तिचा एक डोळा काढला आहे तर दुसऱ्या डोळ्याला गंभीर दुखापत केली आहे. वैद्यकीय तज्ञांच्या मते तिचा दुसरा डोळाही वाचण्याची शक्यता फार कमी आहे. हृदय पिळवटून टाकणारी ही घटना पाहून अनेकांचे डोळे पाणावले. या घटनेमुळे परिसरातील महिला वर्ग भयभयीत झाला असून या घटनेतील अज्ञात नराधम गुन्हेगाराला तत्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी पोलिसांकडे केली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार न्हावरे परिसरातील बिडगर -सुर्यवंशीवस्ती येथे मुक्ता राजू चित्रे ह्या शेतमजूर महिला काल रात्री साडेनऊच्या सुमारास आपल्या झोपडीपासून काही अंतरावर लघवी करण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी त्या ठिकाणी एक पुरुष व्यक्ती येऊन त्यांच्याकडे पाहू लागला. त्यावर मुक्ता चित्रे त्याला म्हणाल्या, तुला काय बाईमाणूस दिसत नाही का ? त्यानंतर त्या अज्ञात गुन्हेगाराने मुक्ता चित्रे यांच्यावर हल्ला करून त्यांचा एक डोळा काढला. तर दुसऱ्या डोळ्याला गंभीर स्वरूपाची दुखापत केली. या महिलेवर करण्यात आलेल्या हल्ल्याचे स्वरूप इतके गंभीर होते की या महिलेचा एक डोळा जमिनीवर पडलेल्या अवस्थेत पोलिसांना आढळून आला. घटनेनंतर काही वेळाने मुक्ता चित्रे यांच्या कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला असता त्या घटनास्थळी निपचित अवस्थेत पडलेल्या होत्या. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच न्हावरे पोलिस दूरक्षेत्र केंद्राचे पोलिस उपनिरीक्षक भगवान पालवे व पोलीस कर्मचारी तत्काळ घटनास्थळी पोहोचले. या महिलेला झालेली दुखापत पाहून पोलिसांनी या महिलेला उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी सांगितले. दरम्यान या शेतमजूर महिलेच्या कुटुंबियांकडे या महिलेला उपचारासाठी घेऊन जाण्यासाठी पैसे नसल्याचे समजताच पोलिस उपनिरीक्षक भगवान पालवे यांनी माणसुकीच्या भावनेतून या महिलेवर उपचार करण्यासाठी दोन हजार रुपये दिले तसेच वाहनाची व्यवस्था करुन तिला ससून रुग्णालय (पुणे) येथे पाठवले. या घटनेतील गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख , बारामती विभागाचे अप्पर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, शिरुर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रविण खानापुरे, पोलिस उपनिरीक्षक भगवान पालवे सहाय्यक पोलिस निरीक्षक ,बिरुदेव काबुगडे, प्रविण राऊत, विकास कापरे यांनी घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून तपासाच्या दिशेने सुत्र हलवली. तसेच आज न्हावरे येथे पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी घटनास्थळाची पाहणी करून पोलिस यंत्रणेला या गुन्ह्यासंदर्भात तपासाच्या दिशेने करावयाच्या कामाबाबत मार्गदर्शन केले. या महिलेवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेच्या तपासाचे व गुन्हेगाराचा शोध घेण्याचे काम पोलिस यंत्रणेकडून चालू आहे. क्रुर पध्दतीने पाशवी कृत्य करणाऱ्या या घटनेतील नराधमास लवकरच गजाआड करण्यात येईल. याकामी परिसरातील ग्रामस्थांनी पोलिसांना सहकार्य करावे असे अवाहन पोलिस निरीक्षक प्रविण खानापुरे यांनी केले आहे.
धक्कादायक! शौचाला गेलेल्या महिलेवर अज्ञाताकडून हल्ला; एक डोळा निकामी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2020 12:00 PM