पुणे : औंध येथील एका कुटुंबातील नवविवाहितेने चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून होत असलेल्या मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून अवघ्या सहा महिन्यातच गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणात पती आणि सासूला अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.ए पत्रावळे यांनी हा आदेश दिला.
पती सौरभ शेखर भादुरी (वय 30) आणि सासू माधुरी भादुरी अशी अटकपूर्व जामीन मंजूर केलेल्यांची नावे आहेत. मालविका सौरभ भादुरी (वय ३२, रा. ट्वीन टॉवर, वेस्टर्न मॉलमागे, औंध) असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे. ही घटना ९ सप्टेंबरला औंधमध्ये घडली. याप्रकरणी मालविका यांची आई नीना रजनीराम कुलुर (वय ५९, रा. सोजास आनंद पार्क, औंध) यांनी चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. मालविका आणि सौरभ यांची अगोदरओळख होती. दोन्ही घरांतील लोकांच्या मान्यतेने त्यांचा 24 मार्च रोजी विवाह झाला. लग्नानंतर काही दिवसांत सौरभ मालविका हिच्या चारित्र्यावर सतत संशय घेऊ लागला. त्यावरून तो तिला मानसिक व शारीरीक त्रास देऊ लागला. या त्रासाला कंटाळून ९ सप्टेंबरला मालविका हिने राहत्या घरी बेडरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, पती सौरभ आणि सासू माधुरी भादुरी यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला. बचाव पक्षाने न्यायालयात युक्तिवाद केला की, सौरभ आणि मालविका एकत्र एका फ्लँटमध्ये राहात होते. परंतु आत्महत्येस प्रवृत्त करण्यासारखे सौरभचे कृत्य नव्हते. दोघेही एकमेकाबरोबर आनंदी होते. हे त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट व इतर पुराव्यांवरून सिद्ध झाले आहे. तसेच माधुरी आणि नवविवाहित दाम्पत्य दोन महिन्यांपासून एकत्र राहत नव्हते. त्यांच्यात फारसा संवादच नव्हता. त्यामुळे माधुरी यांनी मानसिक छळ करण्याचा संबंधच येत नाही. आत्महत्येसाठी कोणते तरी ठोस कारण असणे अपेक्षित असते. पण या दोन्ही गोष्टी यात साध्य होत नाहीत. तसेच आत्महत्येच्या वेळी कोणतीही नोट सापडलेली नाही.
परंतु, सरकारी पक्षाने जामिनाला विरोध करीत सौरभला जामीन मिळाला तर पळून जाण्याची शक्यता असल्याचा युक्तिवाद केला. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सौरभ याला परवानगी घेतल्याशिवाय देश सोडून जाता येणार नाही. पासपोर्ट तपास अधिका-याकडे ठेवावा लागेल अशा काही अटी-शर्तींवर सौरभ भादुरी तसेच माधुरी भादुरी यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला. आरोपीच्या बाजूने अँड हर्षद निंबाळकर, अँड अभिषेक पाटील, अँड सत्यम निंबाळकर आणि अँड शिवम निंबाळकर यांनी काम पाहिले.