पिंपरी : नेहरूनगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुंडांनी दहशत माजवली आहे. दोन दिवसांपूर्वी एका वयस्कर महिलेला घातक शस्त्रांनी मारहाण केल्यानंतर परिसरातील महिलांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन दिले. गुंडांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. त्या वेळी पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले होते. दोन दिवस उलटताच पुन्हा या भागात गुंडांनी घरांवर दगडफेक करून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्रस्त झालेल्या महिलांनी संत तुकारामनगर पोलीस चौकीत सहायक पोलीस निरीक्षक सुरेश मट्टामी यांना घेराव घातला. दहशत माजविणाऱ्या गुंडांचा बंदोबस्त करण्याची जोरदार मागणी त्यांनी केली. शिवीगाळ, छेडछाड, विनयभंग, प्रसंगी मारहाण अशा पद्धतीने दहशत माजविण्याचे प्रकार नेहरूनगर, राजीव गांधी वसाहतीत वारंवार घडत आहेत. गुंडांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस ठोस पावले उचलत नाहीत. गुरुवारी छेडछाड, दमबाजी, घरांवर दगडफेक झाल्यामुळे शुक्रवारी सुमारे ४० महिलांनी संत तुकारामनगर पोलीस चौकीत धाव घेतली. गुंडांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली. महिलेला झालेल्या मारहाणीच्या घटनेप्रकरणी मनोज मसुकांत विटकर, राजू मसुकांत विटकर आणि आकाश शंकर लष्करे (तिघेही रा.नेहरूनगर) या आरोपींना अटक केली होती. तर गबऱ्या ऊर्फ हर्षल पवार आणि दिनेश माने हे दोन आरोपी फरार झाले होते.(प्रतिनिधी)
नेहरूनगरमधील महिलांचा पोलिसांना घेराव
By admin | Published: April 04, 2015 5:56 AM