- माधुरी सरवणकर, पुणेकायदा व सुव्यवस्था आणि वाहतुकीचे नियमन करणाऱ्या महिला पोलीसच सुरक्षित नाहीत. त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची प्रशासनाकडून दखलच घेतली जात नाही, अशी संतप्त भावना पुण्यातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. ठाण्यामध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील महिला पोलिसांशी संवाद साधला असता, रस्त्यावर वाहतुकीचे नियमन असोत की अगदी पोलीस ठाणे, नागरिक पुरुष पोलिसांना घाबरतात; मात्र महिला पोलिसांशी अरेरावीने बोलतात, असा अनुभव त्यांनी सांगितला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांती पवार म्हणाल्या, ‘‘अनेकदा महिला वाहतूक पोलिसांना नागरिकांच्या गैरव्यवहाराला सामोरे जावे लागते. अशी प्रकरणे दुर्लक्षित केली जातात. आपल्याकडे कोणत्याही महिलेसोबत अनुचित प्रकार घडला, तर सर्व नागरिक एकत्र येतात. सरकारसुद्धा ठोस पावले उचलताना दिसते. पोलिसांच्या अन्यायावर सामाजिक संस्थांनी आवाज उठवावा. आमच्या हक्कांसाठी व सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.मी ड्युटीवर असताना अनेक घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी गोखलेनगरमध्ये एक महिला व बसचालकात वाद सुरू होता. तो मिटवण्यासाठी मी गेले असता, त्या महिलेने माझा हात पिरगळून शिवीगाळ सुरू केली. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. सर्वसामान्य स्त्रियांप्रमाणे महिला पोलीसही सुरक्षित नाहीत. - सुर्वणा मोरे, पोलिस कॉन्स्टेबलनागरिक पुरुष कॉन्स्टेबलशी बोलताना घाबरून बोलतात; परंतु एखाद्या महिला कॉन्स्टेबलशी बोलत असताना आरेरावीच्या भाषेत बोलत असतात. महिला कॉन्स्टेबलला नेहमी शिवीगाळ, टपोरी मुलांच्या त्रासाला सामोरे जावे लागते. सध्या कायद्याची भीती कोणालाच राहिलेली नाही, असे वाटते. असे प्रकार थांबविण्यासाठी शासनाने कडक कारवाई करणे गरजेचे आहे. - मनीषा वायसे, पोलिस कॉन्स्टेबलकोणत्याही महिलेवर हात उचलणे ही चुकीची बाब आहे. नागरिकांच्या मनात महिला कॉन्स्टेबलबद्दल आत्मीयता व आदर असणे गरजेचे आहे. नोकरी करीत असताना एखाद्या गुन्हेगारावर कारवाई केल्यानंतर राजकीय वरदहस्तामुळे कित्येकदा अशा गुन्हेगारांना सोडून देण्याशिवाय पर्याय उरत नाही. तेव्हा अशा गुन्हेगारांना कोणत्याही प्रकारची दया दाखविली जाऊ नये, हीच विनंती. - भावना पवार, पोलीस कॉन्स्टेबल
महिला पोलीसही असुरक्षित !
By admin | Published: February 27, 2016 4:38 AM