वारजे : सक्षम समाजासाठी सक्षम युवा पिढी घडत असताना महिलांनी स्वतःचे आरोग्य जपणे गरजेचेच आहे. महिलांनी कुटुंबाबरोबरच आपली प्रकृती जपणे हा वाण आरोग्याचा या कार्यक्रमाचे प्राथमिक उद्दिष्ट असल्याचे मत राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी वारजे येथे व्यक्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी व डॉक्टर सेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रामनगरमधील कै. बनाबाई बराटे शाळेतील महिला आरोग्य तपासणी शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. या वेळी विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, नगरसेवक दिलीप बराटे, सचिन दोडके, सायली वांजळे, डॉ. संगीता खेनट, डॉ. ठुबे पाटील, भावना पाटील, देवेंद्र सूर्यवंशी उपस्थित होते.
चाकणकर म्हणाल्या, की डॉक्टरांच्या सहकार्यानेच राज्यभर वाण आरोग्याचे ही आरोग्य संकल्पना यशस्वी होऊ शकली आहे. आम्ही या कार्यक्रमाला सर्वसमावेशक करण्यासाठी विधवा महिला तसेच तृतीयपंथीयांना देखील समावेश केला आहे. डॉ खेनट म्हणाल्या, महिलांनी स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे, आजार बळावू देऊ नये, व्यायाम, सकस आहार व डॉक्टरी सल्ल्याकडे लक्ष द्यावे स्वतः प्रथम व नंतर इतर हे ब्रीद आरोग्याबाबत बाळगावे.
या आरोग्य शिबिरासाठी डॉ. सुनील जगताप, डॉ. हेमंत ठुसे, डॉ. शशिकांत कदम, डॉ. प्रताप ठुबे, डॉ. अनुपमा गायकवाड, डॉ. ज्योती ठुसे, डॉ. राजश्री मोरे, डॉ. कल्पना जाधव, डॉ. हर्षदा जाधव, डॉ. स्वप्नील पवार व डॉ. हुंडेकरी यांनी नियोजनात सहभाग घेतला.
फोटो ओळ : कै.बनाबाई बराटे शाळेत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.